अभिनेत्री अमिषा पटेलच्या हस्ते श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचे आज उद्घाटन

0

दहा दिवस परळीकरांना मिळणार सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवाणी

परळी : संपुर्ण राज्यात गाजलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचा शुभारंभ आज गुरूवार दि. 13 सप्टेंबर रोजी हिंदी चित्रपटसृष्टीतील कहो ना प्यार हैं, गदरसह अनेक चित्रपटातील गाजलेली अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या हस्ते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

मागील 12 वर्षापासुन धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने परळी शहरात गणेश उत्सवात श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवाचे हे 13 वे वर्ष असुन या गणेश उत्सव काळातील दहा दिवसात विविध सांस्कृतीक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.या वर्षीही अशाच प्रकारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन, या महोत्सवाचा शुभारंभ गुरूवारी सायंकाळी 7 वाजता मोंढा मैदान येथे अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या हस्ते संपन्न होणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमानंतर सिनेतारका संस्कृती बालगुडे, वैशाली जाधव, पुजा पाटील व पुनम कुडाळकर यांचा ‘तुमच्यासाठी काय पण’ हा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे.

तत्पुर्वी दुपारी 1 वाजता महोत्सवाच्या श्रींची प्रतिष्ठापना परळी शहरातील प्रसिध्द डॉ.श्री व सौ.प्रदिप वांगिकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोंढा मैदानात अंदाजे दहा ते पंधरा हजार प्रेक्षक बसु शकतील असा भव्य वॉटरप्रुफ मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. वॉटरप्रुफ मंडपामुळे प्रेक्षकांना भर पावसातही या कार्यक्रमाचा अस्वाद घेता येणार आहे. महिला व पुरूष प्रेक्षकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, उत्तम प्रतिची ध्वनीक्षेपक यंत्रणा, प्रकाश योजना, चोख पोलिस बंदोबस्त आणि मंडपाबाहेरील प्रेक्षकांनाही कार्यक्रमाचा लाभ घेता यावा यासाठी एल.ई.डी.स्क्रीनची सोय करण्यात आली आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आणि तयारीसाठी प्रतिष्ठानचे असंख्य कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

भाऊ कदम, सपना चौधरी, मानसी नाईक, संजय नार्वेकर, आदर्श शिंदे  येणार

या महोत्सवात चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम, सुप्रसिध्द डांन्सर सपना चौधरी, सिनेतारका मानसी नाईक, मेघा घाडगे,मराठी चित्रपटसृष्टीतील संजय नार्वेकर, सुप्रसिध्द गायक आदर्श शिंदे यांच्याही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.14 सप्टेंबर रोजी सिनेतारका अर्चना सावंत, भार्गवी चिरमुले व हेमांगी कवी यांचा ‘नार नखरेवाली’ हा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि.15 सप्टेंबर रोजी सिने अभिनेता संजय नार्वेकर यांचे ‘घरात मॅरीड, बाहेर बॅचलर’ हे तुफान गाजलेले नाटक होणार आहे.

रविवार दि.16 सप्टेंबर रोजी सुप्रसिध्द गायक आदर्श शिंदे यांचा भिमगितांचा कार्यक्रम होणार आहे. रविवार दि.17 सप्टेंबर रोजी सुप्रसिध्द डान्सर सपना चौधरी यांचा ऑकेस्ट्रा कार्यक्रम होणार आहे. सोमवार दि.18 सप्टेंबर रोजी सिनेतारका मेघा घाडगे प्रस्तुत रंगबाजी लावणी कार्यक्रम, मंगळवार दि.19 सप्टेंबर रोजी सुप्रसिध्द कव्वाल मुस्तबा अजिज नाना प्रस्तुत कव्वाली मुकाबला कार्यक्रम, बुधवार दि.20 सप्टेंबर रोजी ‘चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम व सागर कारंडे यांचा ‘करून गेलो गाव’ हा विनोदी कार्यक्रम होणार आहे. गुरूवार दि.21 सप्टेंबर रोजी सिनेतारका मानसी नाईक हिचा ‘मदमस्त अप्सरा’ हा कार्यक्रम तर शुक्रवार दि.22 सप्टेंबर रोजी ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांच्या समाज प्रबोधनपर किर्तनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.