अभिनेत्री उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसमध्ये दाखल

0

मुंबई-अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ह्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून उत्तर मुंबईतून लढणार असल्याची चर्चा होती, अखेर उर्मिला मातोंडकरनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात तगड्या उमेदवाराच्या शोधात कॉंग्रेस होती. असलेल्या काँग्रेसने उर्मिलाला उमेदवारी दिल्यास इथे भाजपचे गोपाळ शेट्टी विरुद्ध उर्मिला मातोंडकर असा थेट सामना होणार आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात भाजपचे वर्चस्व आहे. या मतदार संघातून मिरा-भाईंदरसह वसई-विरार, डहाणू, तसेच पालघर स्वतंत्र झाल्यानंतर या मतदारसंघातून काँग्रेसचे संजय निरुपम निवडून आले होते. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी निरुपम यांचा पराभव केला होता. या मतदारसंघातील विधानसभेच्या सहा आमदारांपैकी भाजपचे ४, शिवसेनेचा १ आणि काँग्रेसचा १ आमदार निवडून आले होते. पालिका निवडणुकीतही भाजपने बाजी मारली होती. याच कारणामुळे निरुपम या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक नव्हते.

या मतदारसंघासाठी कोण उमेदवार द्यावा असा काँग्रेसपुढे प्रश्न होता. भाजपच्या गोपाळ शेट्टींविरुद्ध तगडा उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पक्षाने अनेक सिनेतारकांसह प्रतिष्ठित व्यक्तींना उमेदवारी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. मात्र ही ऑफर कुणीही स्वीकारू शकले नाहीत. मात्र, आता उर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे तिला इथूनच उमेदवारी मिळेल अशी दाट शक्यता आहे. उर्मिला मातोंडकरला इथून उमेदवारी मिळाल्यास या मतदारसंघात तुल्यबळ लढत होण्याती शक्यता आहे.