शिवपुरी : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराची चढाओड सुरूअसून प्रचारात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध नेते मंडळी यांच्या सभा घेतल्या जात आहेत. काँग्रेसच्या नेत्या तथा अभिनेत्री नगमा देखील पक्षाच्या उमेदवाराचा प्रचारासाठी शिवपुरी इथं आल्या होत्या. पण नगमा यांचं स्वागत करण्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं.
कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहून नगमा यांचा पारा देखील चढला होता. नगमा यांनी स्वत: कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी प्रयत्न केला. परंतु तरीही कार्यकर्ते शांत झाले नाहीत. त्यानंतर नगमा यांनी माइक हातात घेऊन सभेला संबोधित केलं आणि कार्यक्रमात येण्यास उशीर झाल्यामुळं जनतेची माफी देखील मागितली.
सभेला संबोधित करताना नगमा यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर जोरदार टीका केली. शिवराज यांच्या सरकारच्या काळात बनविलेले रस्तेच असे आहेत की, मी शनिवारी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही; असं नगमा म्हणाल्या.
नगमा यांच्या प्रचार सभेला कार्यकर्ते भिडल्याची ही पहिलीच घटना नव्हती. या पूर्वी देखील उत्तरप्रदेशमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत नगमा यांच्यासमोर कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती.