मुंबई । भारतीय सिनेसृष्टीवर बराच काळ आपल्या अमिट अभिनयाच्या जादूची छाप सोडणार्या नूतनला आज तिच्या 26 व्या स्मृतिदिनानिमित्त गुगलने अनोखी मानवंदना दिली आहे. गुगलच्या डूडलवर तिच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या रंगछटा दाखवून तिच्या प्रतिभेचा सन्मान केला आहे. 70 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये अभिनय केलेल्या नूतनने सिनेक्षेत्रातील अत्यंत नावाजलेले कित्येक पुरस्कार तर आपल्या नावावर केलेच मात्र प्रेक्षकांच्या मनावर अजूनही तिचे गारुड आहे. याचेच फलित म्हणजे गुगलच्या डूडलने तिच्या जन्मदिवसाला दिलेली ही अनोखी सलामी आहे. 6 वेळा फिल्मफेअर पुरस्कार पटकावणारी ती एकमेव अभिनेत्री आहे. नूतनचा जन्म 4 जून, 1936 रोजी मुंबईत झाला होता.
काय आहे डूडलमध्ये?
गुगलच्या डूडलमध्ये जगभरातील विशेष व्यक्ती, संस्था किंवा उपक्रमांच्या विषयी संबंधित दिवसासाठी आकर्षक डूडल ठेवले जाते. हे डूडल जगभरातील नेटीजन्सच्या गुगल सर्च इंजिनवर दिसून येते. यामध्ये आज, रविवारी नूतनचा वाढदिवस असल्याने गुगलच्या डूडलवर नूतनच्या विविधांगी छटा दिल्या गेल्या आहेत. दु:खी, आनंदी, हासरी आणि लाजाळू अशा चार प्रकारच्या अभिनयाच्या रंगछटा असलेले नूतनचे चार मुखवटे या डूडलमध्ये दिले गेले आहेत. यावर क्लिक केल्यानंतर नूतनबद्दलची माहितीदेखील वाचकांना दिसून येत आहे.
कलाकारांना सलाम
यापूर्वी डूडलने भारतीय चित्रकार जैमिनी रॉय यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त मानवंदना दिली होती तर कन्नड अभिनेते आणि गायक राजकुमार यांच्या 88 व्या जन्मदिनीदेखील कलेला सलामी देण्यात आली होती. यानंतर आता दिवंगत नूतनला हा मान मिळाला आहे. दोन दशकांनंतरही विस्मृतीत न जाणार्या या अभिनेत्रीच्या कार्य कर्तृत्वाचा हा अनोखा सन्मान असल्याची भावना कलाकारांनी आणि सिनेप्रेमींनी व्यक्त केली आहे. आपल्या 55 वर्षांच्या आयुष्यात नूतनने अनेक अभिनेत्यांसोबत काम केले. तिच्या प्रत्येक सिनेमात वेगळेपण असल्याने चित्रपटसृष्टीत तिची वेगळीच ओळख होती. 21 फेब्रुवारी 1991 रोजी तिचा कॅन्सरच्या आजाराने मृत्यू झाला.