मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे पुन्हा एकदा मराठी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत. ‘प्रवास’ या सिनेमातून त्या मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. तब्बल 14 वर्षांनी त्या रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत.
‘प्रवास’ या सिनेमाच्या निमित्ताने मराठी रंगभूमी आणि मराठी नाटक याबाबत असलेले प्रेम त्या लपवू शकल्या नाहीत. मराठी रंगभूमीवर अनेक दर्जेदार आणि उत्तम नाट्यकृती गाजल्या आहेत आणि गाजतही आहेत. आपल्याला वेळ असता तर मराठी नाटकांमध्ये काम करायला नक्की आवडलं असतं असं पद्मिनी कोल्हापुरे यांनी म्हटले आहे. सिनेमाला एक मर्यादा असते, म्हणजेच सिनेमा एका विशिष्ट तारखेला सुरु होतो आणि ठराविक काळानंतर तो संपतो. मात्र नाटकांचं तसं नाही. वर्षानुवर्षे नाटकं रंगभूमीवर सुरूच राहतात. त्यामुळे नाटकावर लक्ष केंद्रीत केल्यानंतर इतर गोष्टींकडे लक्ष देण्यास तितकासा वेळ मिळत नाही असंही पद्मिनी कोल्हापुरे यांनी म्हटले आहे. चिमणी पाखरं या सिनेमातून पद्मिनी कोल्हापुरे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर त्यांनी मंथन या सिनेमातही काम केले आहे.