पुणे। पुण्याचा गुणवान बुद्धिबळपटू अभिमन्यू पुराणिकने वयाच्ता 17 व्या वर्षी बुद्धिबळातील प्रतिष्ठेचा ग्रँडमास्टर किताब मान मिळविण्याची अपवादात्मक कामगिरी केली. अबू धाबी येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावताना अभिमन्यूने ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक असलेला तिसरा नॉर्म मिळविला, तसेच 2500 एलो गुणांचा टप्पाही ओलांडला.
अभिमन्यू पुराणिक हा भारताचा 49 वा, महाराष्ट्राचा सातवा आणि पुण्याचा तिसरा ग्रँडमास्टर ठरला आहे. त्यातही केवळ 17 वर्षे 6 महिने व 19 दिवस वयाचा अभिमन्यू महाराष्ट्राचा सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टरही ठरला आहे. याआधी विदित गुजराथीने वयाच्या 18व्या वर्षी हा किताब मिळविताना विक्रमी कामगिरी केली होती. अभिमन्यूने याआधी कॅडेट गटात सात वर्षांखालील जगज्जेतेपदही पटकावले होते. त्या वेळी पुण्यातील तो पहिला बुद्धिबळ जगज्जेता ठरला होता. अबू धाबी बुद्धिबळ स्पर्धेत अभिमन्यूने नऊ फेर्यांपैकी तीन लढती जिंकताना पाच सामने बरोबरीत सोडविले. तर केवळ एका सामन्यात-ग्रँडमास्टर पार्लिग्रास मिर्कियाकडून पराभव पत्करला. आठव्या फेरीतील बरोबरीमुळे त्याचा ग्रँडमास्टर किताब निश्चित झाला. अभिमन्यूने महिला आंतरराष्ट्रीय मास्टर प्रत्यूषा बोड्डा, महिला ग्रँडमास्टर गु झियाओबिंग आणि ग्रँडमास्टर इंडजिक अलेक्झांडर यांच्यावर विजय मिळविले.पुण्यातील एमजे एव्हरी संडे रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत नियमितपणे खेळण्याचा सराव त्याच्यासाठी उपयुक्त ठरला. नामवंत क्रीडा मानसशास्त्र तज्ज्ञ देबश्री मराठे-दांडेकर या अभिमन्यूच्या सायकॉलॉजिकल ट्रेनर असून सर्वोच्च स्तरावर ताणतणावांचा सामना करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन बहुमोल ठरले असल्याचे अभिमन्यूचे प्रशिक्षक जयंत गोखले यांनी सांगितले. एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया हे अभिमन्यूचे प्रायोजक आहेत.