मुंबई: सांगली आणि कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन केले जात आहे. यात मराठी सिनेकलाकारही मागे नाहीत. अनेकांनी पुरग्रस्तांपर्यंत आपली मदत पोहोचवली आहे. दरम्यान बॉलीवूड अभिनेते रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरग्रस्तांसाठी २५ लाखाची मदत केली आहे. त्यांनी २५ लाखांचा चेक मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिला आहे.
मराठी कलाकार पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहे, मात्र बॉलीवूडच्या अनेक कलाकारांना महाराष्ट्राने घडविले आहे. कलाकारांची महाराष्ट्र कर्मभूमी राहिली आहे, असे अनेकदा बॉलीवूड कलाकार मुलाखतीत सांगत असतात. मात्र खऱ्या मदतीची गरज असतांना बॉलीवूडचे कलाकार गेले कोठे? अशी विचारणा होत आहे. मनसेने यावरून बॉलीवूड कलाकारांना चांगलेच घेरले आहे.