अभियंत्यांच्या हातून कधीही चुकीच्या गोष्टी घडू नयेत

0

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे प्रतिपादन

पिंपरी-चिंचवड : तांत्रिक सेवेसाठी पाठीवर थाप मिळेलच, याची अजिबात खात्री नाही. मान-सन्मानाची अपेक्षा न बाळगता कृतिशील काम करून ध्येय पूर्तीकडे जाणारा खरा माणूस असतो. आपल्या कामावर शहराचं भवितव्य अवलंबून आहे. आपल्या हातून चुकीच्या गोष्टी घडू नयेत, यासाठी अभियंत्यांनी सदैव दक्ष असावे. शहरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याचे आव्हान आपणा सर्वांसमोर आहे. शहरातील नागरिकांना पुरेशा सोयी-सुविधा पुरविण्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड ज्युनिअर इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, काटेपुरम चौक, पिंपळेगुरव येथे सोमवारी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, लेखक विवेक घळसासी, सुलक्षणा महाजन, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, इ प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेविका माधवी राजापुरे, सीमा चौगुले, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, नगरसेवक तुषार हिंगे, तुषार कामठे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर, सहशहर अभियंता प्रवीण तुपे, आयुबखान पठाण, रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, सतीश इंगळे, रामदास तांबे, संजय कांबळे, मकरंद निकम, संजय कुलकर्णी, प्रशांत पाटील, शिरीष पोरेड्डी, ज्युनिअर इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल मेंगशेट्टी, सुनील बेळगावकर, शामसुंदर बनसोडे, भगवान मोरे, उल्हास भालेराव, अशोक कुटे उपस्थित होते.

रंगमंदिराच्या कामाच्या स्तुती
महापौर नितीन काळजे म्हणाले, ज्यांनी हे रंगमंदिर उभारण्यासाठी योगदान दिले; त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण हे रंगमंदिर पाहिल्यानंतर परिपूर्ण सेवा सुविधांनी उपयुक्त असे कलादालनच वाटत आहे. रंगमंदिराचे काम अतिशय सुरेख झालेले आहे. अशाच प्रकारे महापालिकेकडून इतरही कामकाजाचे चांगले नियोजन झाल्यास शहराला भेडसावत असणार्‍या समस्यादेखील सुटण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

संयोजनात यांचा हातभार
यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, लेखक विवेक घळसासी, सुलक्षणा महाजन व कनिष्ठ अभियंता राजेश जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल मेंगशेट्टी यांनी केले. सूत्रसंचालन किरण अंदुरे व पल्लवी सासे यांनी केले. तर, सुनील बेळगावकर यांनी आभार मानले.