पिंपरी चिंचवड : हिंजवडीतील आयटी अभियंत्याने राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मेगापोलिश सोसायटीत गुरुवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.
विद्यासागर पाथा (२५, रा. हिंजवडी, मूळ रा. विशाखापट्टणम्) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो हिंजवडीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत होता. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसातच्या सुमारास पोलिस ठाण्यात याबाबत माहिती कळविण्यात आली. फेजतीन मेगापोलिश या सोसायटीत राहणाऱ्या पाथा याने सहाव्या मजल्यावरून उडी मारली. त्याला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले. पाथा याने आत्महत्याकरण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याच्या आत्महत्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याचा मृतदेह पोलिसांनी कुटुंबीयांच्या हवाली केला आहे. घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.