जळगाव । मागील 30 वर्षांचा विचार केला तर शैक्षणिक काळात विद्यार्थ्यांसाठी एवढ्या प्रमाणात स्पर्धांचे आयोजन होत नसे. आधुनिक काळातील विद्यार्थ्यांना मात्र हि संधी मिळालेली आहे. शिक्षण घेत असताना घेतलेल्या पदवीचा पूर्ण फायदा कसा करता येईल याचा विचार करावा. आपल्या आतील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे नियोजन केले जाते. यामुळे अंतर्गत प्रेरणा जागृत होते आणि आपण विकसित होतो. अभियंत्याचे शिक्षण घेऊन तांत्रिक बदल करण्याची क्षमता हवी असे मत भुसावळ थर्मल पॉवर स्टेशनचे उपमुख्य अभियंता माधव कोठुळे यांनी व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सेकण्डशिफ्ट पॉलीटेक्निक अंतर्गत पॉलीटेक्निक मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील परोक्ष या टेक्नीकल कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माधव कोठुळे, कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, प्राचार्य डॉ. प्रभाकर भट, उपप्राचार्य प्रा.हरीश भंगाळे व परोक्षचे मुख्य समन्वयक प्रा.गणेश धनोकार उपस्थित होते. स्पर्धेत मुंबई, नाशिक, धुळे, चाळीसगाव, औरंगाबाद, नगाव आदी शहरातील 502 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून तब्बल 85 हजाराचे पारितोषिके देण्यात येणार आहेत.
वेगवेगळे प्रकल्प सादर
यावेळी आयोजित स्पर्धेत प्रोजेक्ट सादरीकरण- 73, पोस्टर सादरीकरण- 63, मेकेग्रफिक्स- 20, टाउन प्लानिंग-70, रोबो रेस- 60, सर्किट मानिया- 18, सी-क्विझ- 118 व एन.एफ.एस.मोस्ट वान्टेड- 80 असे तब्बल 502 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. संशोधनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प सादर केले. स्पर्धेत सूत्रबद्धता टिकून राहावी यासाठी प्रत्येक स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली होती. सूत्रसंचालन उर्वशी शर्मा अक्षय फारवानी तर आभार रागिणी जोगी यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.