अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारी पर्यावरणपूरक गाडी केली तयार

0
वर्षभराच्या परिश्रमानंतर केली मोटर तयार
तळेगाव दाभाडे : येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे अभियांत्रिकी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हे विद्यार्थी जगात कुठेही गेले तरी त्यांना अव्वल असे यश मिळेल यात शंका नाही. वडगाव मावळ परिसरातील डॉ. डी. वाय. पाटील या संस्थेतील विद्यार्थी देखील अत्यंत हुशार असून त्यांना देण्यात येणारे प्रकल्प लोकांना उपयुक्त ठरतील असेच बनवितात. येत्या शैक्षणिक वर्षातही अत्यंत अभिनव प्रकल्प तयार केला आहे. प्रकल्प कार्यांतर्गत या मुलांनी सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रीक मोटर बनविली आहे. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या भावामुळे वाहनचालकांना मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ही इलेक्ट्रिक मोटर तीन तास चार्जिंग केल्यानंतर साधारणतः ताशी चाळीस कि.मी.च्या वेगाने ऐंशी किलोमीटर धावूशकत असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
प्रदुषणाचे स्वरूप भीषण
दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत चालले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या भाव वाढ रोजच होत असून त्यामुळे सर्वसामान्य माणूस खूप वैतागला आहे. त्यातच प्रदुषणाचे स्वरूप अत्यंत भीषण होत चालले आहे. या प्रदुषणामुळे जागतिक तापमानात वाढ झाल्याने आणि इंधनाच्या वाढत्या दरांमुळे इंधनावरील कार वापरण्यावर मर्यादा येऊ लागल्या आहेत. याच पार्श्‍वभूमीवर या विद्यार्थ्यांनी ही कमी खर्चातील आणि पर्यावरणपूरक अशी मोटर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मोफत आणि मुबलक उपलब्ध असणार्‍या सौर ऊर्जेवर चालणारी ही मोटर  विकसित करण्यात आंबी येथील डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीरिंग अकॅडेमिच्या यंत्र अभियांत्रिकी अंतिम वर्ष शाखेच्या विद्यार्थ्यांना यश आले आहे. या मोटरमध्ये दोन व्यक्ती बसू शकतील, अशी रचना आहे. पॅनल, बॅटरी आणि इलेक्ट्रीक सर्वो मोटर वापरुन गेल्या वर्षभराच्या परिश्रमानंतर यशस्वी होऊन प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे.
डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.विलास नितनवरे यांनी सांगितले की, या 10 मुलांनी केलेला प्रकल्प अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. अभियांत्रिकी शिक्षणाचा उपयोग लोकांच्या ˆˆफायद्यासाठी झाले तर खरच गौरवाची गोष्ट असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचाही कौतुक केले पाहीजे. ही गाडी प्रदर्शन आणि शहरांतर्गत मर्यादीत पल्ल्याच्या प्रवासासाठी सोईस्कर ठरू शकते. कॅम्पस डायरेक्टर रमेश वसप्पानवर, अध्यापक सागर पाटील आणि सागर शिंदे यांच्या बहुमोल मार्गदर्शनाची जोड मिळाल्यामुळे ही विशेष कार निर्मिती होणे शक्य झाले.