मुंबई (प्रतिनिधी) – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६० व्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवारी चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केले. देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या कष्टकर्यांसह विविध स्तरातील लोकांच्या उपस्थितीने चैत्यभूमीत भीम अनुयायींचा जनसागर लोटला होता.
मुंबई महापालिकेने पुरविल्या सुविधा
महाराष्ट्राच्या खेड़्या-पाड्यातून तसेच आंध्रा, उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी भागातून छोट्या तान्हुल्यापासून ते वयोवृध्दांचीही पावले चैत्य्भूमीच्या वाटेवर वळली होती. प्रत्येक लोकलमधून दादर स्टेशनवर जथेच्या जथ्थे उतरत होते. दादर ते चैत्यभूमीच्या रस्त्याने एका रांगेत हे जथ्थे चालत होते. चैत्यभूमीवर गर्दीचा सागरच उसळला होता. मुंबई महापालिकेच्या सुविधाही पुरेसा पुरवण्यात आल्यने अनेकांनी समाधान व्यक्त केले.
बेस्टचे सहकार्य
दी बुध्दीस्ट सोसायटी आॉफ इंडियाच्या शाखांच्या स्वयंसेवकांनी व समता सैनिक दलाच्या सैनिकांनी अनुयायांच्या रांगेविषयी शिस्तबध्दता राखली होती. मुंबई महापालिकेने पिण्याच्या पाण्याची सोय, फिरती शौचालये आदी पुरेसा सुविधा पुरवल्यने कोणतीही अडचणी आल्याच्या तक्रारी नव्हत्या. बेस्टनेही सुविधा पुरवण्यास कुचराई केली नव्हती.