मराठा क्रांती मोर्चा कोणत्याही जातीविरोधात नाही. कोणत्याही जाती, समाजाचे आरक्षण कमी करुन ते मराठ्यांना मिळावे ही देखील मागणी नाही. मराठा समाजात देखील आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेले बांधव आहेत. आरक्षण नसल्याने मराठा तरुण तरुणींना अनेकदा नोकरी, शिक्षणात मागे रहावे लागले. कारण खुल्या वर्गात जी फी भरावी लागते ती त्यांच्याकडे भरायला पैसा नाही. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्यांची लहानमुले मराठा मोर्चात सहभागी झालेली. लहान वयात बापाचा आधार गमावणे यापेक्षा दुर्दैव नाही. त्या लहान मुलांच्या मनात खूप प्रश्न होते. ती उत्तरे मिळवायला ते निष्पाप जीव मोर्चात आलेले. महाग झालेले शिक्षण, बेरोजगारी, शेतीत होणारा तोटा ही मराठा समाजाच्या अस्वस्थतेची मुख्य कारणे आहेत. कोणत्याही जाती धर्माच्या मुलीवर अत्याचार झाले तर शासन कडकच असावे… राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा मोर्चे झाले. अत्यंत शांत, शिस्तप्रिय मार्गाने आणि लाखोंच्या संख्येने काढलेल्या मोर्चाचे कौतुक करावे तितके कमी…आणि या अभूतपूर्व मोर्चाची वार्तांकनाच्या निमित्ताने साक्षीदार झाल्याचा मला अभिमान आहे.
– शैलजा जोगल, साम टीव्ही