पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीपट्टी दरवाढीवरुन अभूतपूर्व गोंधळ झाला. भाजपने विरोधकांना निलंबित करण्याचा दम भरला. महापौर नितीन काळजे यांनी तर नियमांची ऐंशी की तैशी केली. दरवाढीच्या उपसूचनेला अनुमोदन न घेताच तुघलकी विषय मंजूर केला. त्यानंतर विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातल्यावर ‘तुम्ही तुमचा विरोध नोंदवा. त्यावर चर्चा करा’, असे विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना महापौरांनी सांगितले. परंतु, विषय मंजूर झाल्यावर त्याला विरोध कसा नोंदवायचा, त्यावर चर्चा कशी करायची, त्या चर्चेला काही अर्थ आहे का, असा सवाल राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी उपस्थित केला आणि जोरदार घोषणाबाजी करीत सभात्याग केला.
सत्ताधार्यांकडून दरवाढीचे कौतुक
फेब्रुवारी महिन्याची तहकूब सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. पाणीपट्टी दरवाढीचा विषय चर्चेला येताच भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी यांनी पाणीपट्टीत फेरबदल करण्याची उपसूचना मांडली. त्यानंतर पाणीपट्टी दरवाढीवर चर्चेला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि भाजपच्या नगरसेवकांनी चर्चेमध्ये भाग घेतला. राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांनी पाणीपट्टी दरवाढीला तीव्र दर्शविला. तर, भाजपच्या नगरसेवकांनी पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव चांगला असल्याचे सांगत कौतुक केले. परंतु, सुरळित पाणीपुरवठा करा अशी मागणी केली. दोन नगरसेवकांनी पाणीपट्टी दरवाढीला विरोध दर्शविला.
विनया तापकीर यांचा हल्लाबोल
विनया तापकीर यांनी पाणीपट्टी दरवाढीवरुन सत्ताधार्यांवर जोरदार हल्लाबोल केला. चर्होलीत सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. पाण्याची मोठी समस्या आहे. नळाला केवळ हवा येते. नागरिकांनी काय हवेचा कर भरायचा काय? असा सवाल उपस्थित केला. त्यांचे भाषण सुरु असताच भाजपच्या काही अभ्यासू नगरसेविका, चर्होलीतील भाजपच्या नगरसेविका सुवर्णा बुर्ड़े यांना भाषण करण्यासाठी मुद्दे देत होत्या. तापकीर यांचे बोलणे संपताच बुर्डे यांनी बोलण्यासाठी परवानगी मागितली. परंतु, महापौरांनी सचिन चिखले, तुषार कामठे यांना बोलण्याची संधी दिली.
तापकीर-सुवर्णा बुर्डे हमरीतुमरी
कामठे यांचे भाषण झाल्यानंतर बुर्डे यांनी भाषणास सुरुवात केली. त्या म्हणाल्या, गेले अनेक वर्ष सत्तेत असणारे आता पाणीपुरवठ्याबाबत बोलत आहेत. गेली पाच वर्ष चर्होलीत पाणीपुरवठ्याची भीषण समस्या होती. आता आम्ही समस्या कमी करण्यावर भर देत आहोत. त्याला राष्ट्रवादीच्या विनया तापकीर यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोघींमध्ये हमरी-तुमरीस सुरुवात झाली
गोंधळातच विषय मंजूर
महापौरांनी दोन्ही नगरसेविकांना शांत राहण्याचे आवाहन केले. शांत राहा नाहीतर दोघींना देखील सभागृहाच्या बाहेर काढण्यात येईल, असे देखील त्यांनी बजावले; मात्र दोघींची हमरी-तुमरी सुरु होतीच. यातच महापौरांनी दरवाढीचा विषय उपसूचनेसह मंजूर केल्याचे जाहीर केले. उपसूचनेला अनुमोदन न घेताच परस्पर हा विषय रेटून नेला. त्यावरुन राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी कागदे फिरवित महापौरांच्या आसनाकडे धाव घेतली. जोरदार घोषणाबाजी केली. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापौरांनी सभा 20 मिनिटे तहकूब केली.
गोंधळी सदस्यांना निलंबीत करा
पुन्हा सभा सुरु झाल्यानंतर परस्पर विषय मंजूर केल्यावरुन विरोधकांनी महापौरांना धारेवर धरले. त्यावर विषय मंजूर केला आहे. तुम्ही त्यावर आता चर्चा करा. तुमचा विरोध नोंदविला जाईल. ’तुम्ही खाली बसा, राजदंडाला हात लावायचा नाही’ असे महापौर काळजे यांनी विरोधकांना सांगितले. मात्र विरोधकांनी याला आक्षेप घेतला. एकदा विषय मंजूर केल्यावर त्या चर्चेला काही अर्थ नाही. तेवढ्यात भाजपच्या नगरसेवकांनी सभा रेटून नेण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या काही नगरसेवकांनी महापौर आसनासमोर आंदोलन करणार्या नगरसेवकांना तीन महिने निलंबित करा, अशा सूचना महापौरांना केल्या.
चाटून खा…पुसून खा…भाजप
विरोधकांनी सत्ताधार्यांचा निषेध नोंदवत सभात्याग केला. भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ’चाटून खा.. पुसून खा… भाजप’ ’खोदून खा.. खरडून खा …. भाजप’ ’पाणीचोर भाजपचा धिक्कार असो, पाणी दरवाढ रद्द करा नाहीतर खुर्च्या खाली करा’ अशा जोरदार घोषणा दिल्या. नियमांची पायमल्ली करणा-या महापौरांचा धिक्कार असो’ अशाही घोषणा दिल्या.