अभेद्य राजगड व वाघरु, एक रोमांचक अनुभव

0

पदभ्रमणास सुरुवात
आम्ही किला चढायला सुरुवात केली. सुवेळामाचीच्या खाली उतरलेल्या दांडाच्या खालच्या उतारावर घनदाट वाढलेले जंगल लक्ष वेधून घेत होते. मी तोरणा नेहमीच पाहतो, व तोरण्याच्या बाबतीत जंगलाचा अभाव ही खंत राजगडावर मला दिसली नाही. व मी काहीस सुखावलो. जस जसे आम्ही पदमावती माचीच्या दिशेने, चढत होतो, तसतसे, डावीकडे सुवेळामाची चे नेढे, मोठे झाल्यासारखे भासत होते. मधूनच ढग येऊन नेढं व सगळी सुवेळा माची ढगात नाहीशी होत होती. आम्ही किल्ला तर चढत होतो पण किल्ला, म्हणजे पदमावती माची, बालेकिल्ला काही दिसत नव्हते. कारण राजगडाने देखील फेटा बांधलेला होता. मधूनच दिसणारी सुवेळा माचीच काय ती आम्ही राजगडावरच चढत आहोत याची जाणीव करुन द्यायची. अन्यथा हा प्रवास, म्हणजे, स्वर्गारोहणापेक्षा वेगळे काही नव्हते आम्हासाठी. चोर दरवाज्याच्या खालच्या दांडाने आम्ही चढत होतो.उभी चढण थोड्या वेळासाठी, आडवी होते. त्या पठाराच्या उजवीकडच्या दांडावर मला एक राबता असलेला वाडा दिसला. हा वाडा म्हणजे शनिवार वाड्यासारखा, किंवा कोणत्याही सरदाराचा वाडा नव्हता. हा रावता वाडा म्हणजे मावळी धनगर ज्ञातीच्या, लोकांच्या गाई गुरांस बाधण्याचा गोठा होय. अशा जंगलात असलेल्या गोठ्यास आज ही स्थानिक लोक वाडा असेच म्हणतात. वाडा उजवीकडे हळु हळु खाली जात होता व आकाराने लहान होत होता. तस तसा मला गोनिदांचा सोपान दरडीगा (दरडीगे वाडीचा धनगर) आठवू लागला.

गोनिदांनी रगवलेला बाबुदा, हानुवती, यसुदी, वयनी, दरडीगा धनगर आणि बाबुदाचे अनामिक प्रेम म्हणजे वाघरु. एकेक पात्र डोळ्यासमोरुन जात होते. जणू सोपान दरडीगाच त्याच्या त्या वाड्यात गायी-गुरं कोंबताना मला भासू लागला. किल्ला जिवंत होतोय असं काहीसं जाणवू लागलं. गोनिदांची सगळी पात्र किल्ल्यावर राबती आहेत की असं वाटू लागलं. ओर दरवाजच्या खालच्या कड्याला असलेल्या पाण्याच्या टाक्याच्या कडेला बसून, घामाघूम झालेला बाबुदा मला दिसला व थकलेल्या मला, हाताने इशारा करुन, टाक्याकडे बोलावतो आहे असे भासू लागले.आम्ही देखील तिथेच वाहत्या पाण्याने आमची तहान भागवली व पुढे उभ्या चढाईला सुरुवात केली. वनविभाग व पुरातत्व खात्याने सध्या त्या उभ्या निसरड्या पाय वाटेला आधारासाठी खांब आणि भक्कम रेलींग केले आहे. हे आधार नसतील तर काय बिशाद कुणाही ऐ-या गै-याची चोरवाटेने किल्ल्यात प्रवेश करायची? आणि अशीच अवस्था किल्यावर येणा-या सगळ्याच पायवाटांची आहे. म्हणूनच महमद हाशीम खलीखानाला ह्या किल्ल्याला चहुंगाने वेढा देणे अशक्यप्राय वाटले यात नवल ते काय? आता आम्ही चोरदरवाज्यातून वाकून गडावर पाऊल ठेवले. समोर लालतोंडी माकड आमच्या स्वागताला तयारच होती. अनेकदा काही हौशे गवशे नौशे, गडावर येताना भरपूर खाद्यपदार्थ आणतात, व खाली उतरताना ते शिल्लक राहीलेले असतील तर, किंवा अतिउत्साहापोटी ह्या माकडांना ते खाद्य पदार्थ खाण्यासाठी टाकतात. जंगली माकडांना, ह्या शहरी माकडांनी टाकलेला तो माकडमेवा खूप आवडतो, व अशा अनेक शहरी माकडांमुळे, ही लालतोंडी माकडांनी मात्र, आलेल्या प्रत्येक पर्यटकाने त्यांना बिस्कीटे वैगेरे खायला दिल्याशिवाय पुढे जायचे नाही, असा अलिखित नियमच बनवून टाकला आहे व ते प्रत्येक पर्यटकाकडे आशाळभूत नजरेने पाहत राहतात. त्यातच पर्यटकांमध्ये कुणी एकटा दुकटा व्यक्ति, बाई बापडी, पोरं सोरं दिसली तर आशाळभूत नजर लोप पाऊन, हिसकावून घेण्यासाठी माकडांचा कळप माणसावर तुटून पडतो व हातातील पिशवी घेउनच पसार होतो. (थोडक्यात काय तर माणसे किल्ल्यावर जाऊन माकडचाळे करतात, तर माकडे किल्यावार माणूसचाळे करीतात ) चोरदरवाज्यातून किल्ल्यावर चढले की समोरच पदमावती तलाव दिसतो. तलाव चांगला औरस आहे, तलावाच्या भिंती अजूनही शाबूत आहेत. तलावाच्या समोरच, म्हणजे चोरदरवाज्यातून किल्ल्यावर प्रवेशते झाले की लगेचच, उजवीकडे चिलखती बुरुजाच्या सताठ देवळ्या दिसतात. ह्या देवळ्यांमध्ये उभे राहून, गुंजवणीच्या दाम्डावर टेहळणी करता येते. तसेच चुकून एखादा शत्रू खालची खडी चढण, चढून येणाचा प्रयत्न करतोय असे दिसले की ह्याच देवळ्यांमधून भाले, धोंडे, तीर आदींचा वर्षाव त्यांच्या वर केला जाई. शाइस्ता खान राजांस मारण्या किंवा धरण्यासाठी, विडा उचलून आला. तेव्हा पुनवडी बेचिराख करण्याचे स्वपच जणू उराशी बाळगून आला होता. मावळ पट्टा, वतनदा-या, गावे, खेडी पाडी, किल्ले, देवळे वाटेत जे जे लागेल ते सर्व उध्वस्त करीत खान रयतेचे हालहाल करीत होता. त्यानंतर अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी देखील म्लेच्छ टोळ्या हिरडस मावळ व गुंजण मावळात हाहाकर करण्यासाठी धुडगुस घालीत. धर्मांध राक्षसांनी बाया बापड्या भ्रष्टविल्या, गावेच्या गावे मारली गेली, काही देशमुखांना जबरी मुसलमान केले गेले, काहींना वतने सोडून पळवून लावले तर काहींची चामडी सोलण्यात आली. शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये अनेक किल्ले स्वराज्यात सामील झाले व पुन्हा गनिमाने हस्तगत केले. राहीला तो फक्त राजगड. तीच अवस्था पुढे मिर्झा राजे जयसिंगाच्या आक्रमणावेळी झाली. राजगड काही कधी पडला नाही. राजगड अभेद्य राहीला त्याचे कारणच आहे राजगडाच्या तीन माच्या व त्यावरील चिलखती तटबंदी व चिलखती बुरुज. दुहेरी तटबंदी, दोनही तटांच्या मधून दोन अडीच मीटरची वाट, भुयारी परकोट, दिंडे, दगडी सोपान, हे सगळे अचंबीत करणारे आहे. प्रत्येक माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे.
हेमंत ववले,
निसर्गशाळा, पुणे