स्वरसागर महोत्सवाचा तिसरा दिवस
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने आयोजित एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवात शनिवारी(3 फेब्रुवारी) ज्येष्ठ गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ यांचे गायन व कोलकत्ता येथील पूरबायन चटर्जी यांचे सतारवादन सादर झाले. पूर्णानगर येथील शनिमंदिराशेजारील पटांगणावर गुरुवारपासून चार दिवसीय महोत्सव सुरू आहे.
पूरबायन यांच्या फ्युजनने रसिक खुष
पहिल्या सत्रात कोलकत्ता येथील सतारवादक पूरबायन चटर्जी यांचे सुमधूर सतारवादन सादर झाले. त्यांनी यावेळी फ्युजन सादर केले. सतार, तबला, पर्कशन, गिटार, कीबोर्ड या सा-या वाद्यमेळाच्या अनोख्या फ्युजनने रसिकांना मंत्रमुग्ध केले. पूरबायन यांना त्यांच्या या फ्युजन वादनात तबला साथ केली ज्येष्ठ तबला वादक पं. अनिंदो चटर्जी यांचे पुत्र व शिष्य अनुब्रत चटर्जी यांनी. तसेच पर्कशनची साथ युवा वादक व ज्येष्ठ पर्कशनिस्ट तौफिक कुरेशी यांचे पुत्र व शिष्य शिखरनाद कुरेशी यांनी केली. तसेच की बोर्डची साथ संगीत हळदीपूर यांनी व गिटार साथ रिदम शॉ यांनी केली. यावेळी पूरबायन चटर्जी खास आग्रहावरुन महेश काळे यांनी मनमंदिरा तेजाने हे कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील गीत सादर केले. त्याला पूरबायन यांनी सतारीची साथ करुन उपस्थित रसिकांना खूष करुन टाकले.
82 वर्षीय उस्तादांनी मने जिंकली
दुसर्या सत्रात ज्येष्ठ गायक व नुकतेच पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ यांचे अभ्यासपूर्ण गायन झाले. अनेक नामवंत कलाकारांचे गुरु असलेल्या उस्तादजींनी आपल्या अलौकिक गायकीने भारतीय संगीतात अनेक मानदंड निर्माण केले आहेत. सहसावन सेतिया घराण्याची गायकी जोपासणारे उस्तादजी सध्या 82 वर्षांचे आहेत. पण आजही त्यांचे गायन त्यांच्या जुन्या गायनाची आठवण करुन देणारे आहे. त्यांनी यावेळी यमनकल्याण सादर केला. मैफिलीचा शेवट भैरवीतील रामभजनाने केला. त्यांना तितकीच समर्पक संवादिनीची साथ सूरमणी पं. अनंत खेमकर या बुजूर्ग कलाकाराने केली. सारंगीसाथ लियाकत अली खाँ यांनी तबलासाथ अथर हुसेन यांनी व उस्तादजींना गायनसाथ त्यांचे तीन सुपुत्र मुर्तुजा मुस्तफा, कादिर मुस्तफा आणि रब्बानी मुस्तफा यांनी केली.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक संजय नेवाळे, संयोजक व सहशहर अभियंता प्रवीण तुपे, सहसंयोजक संजय कांबळे, सुरेखा कुलकर्णी, पणन विभागाच्या वित्त व प्रशासन विभाग उपसंचालिका अस्मिता बाजी, सतीश इंगळे, सुनील पवार, सतीश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सरोज राव यांनी केले.