पुणे । मानवी संस्कृती, पर्यावरण आदी गोष्टींच्या अभ्यासासाठी उत्खनन महत्त्वाचे ठरते. या मानवी संस्कृतीच्या अभ्यासात विसाव्या शतकात लागलेला ’डीएनए’चा शोध आपल्यासाठी मोठी उपलब्धी आहे, असे प्रतिपादन डेक्कन कॉलेज येथील पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी केले. मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) आणि मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर ’पुरातत्त्वशास्त्र’ या विषयावर डॉ. जोगळेकर बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिकेच्या सभागृहात झालेला हा चौथा वैज्ञानिक कट्टा होता. याप्रसंगी विज्ञान परिषदेच्या कार्यवाह नीता शहा, अॅड. अंजली देसाई आणि विज्ञान शोधिकेच्या सहसंचालिका नेहा निरगुडकर उपस्थित होत्या.
उत्खननात तंत्रज्ञानाचा फायदा
उत्खननात मानवी सांगाडे, वनस्पती, प्राणी-पक्ष्यांचे अवशेष, भांडी आणि तत्सम इतर साहित्याच्या आधारे संगणकाच्या मदतीने त्याचा कार्यकाळ शोधला जातो. नव्याने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाचाही मोठा फायदा या उत्खननात मिळालेल्या गोष्टींच्या अभ्यासात होत आहे. मॉडेलिंग, सिग्नेचर पद्धतीने या अवशेषांचे विश्लेषण केले जाते. डीएनएमुळे मानव, वनस्पती, प्राणी, पक्षी आणि पर्यावरणातील इतर घटकांची इत्यंभूत माहिती अचूकपणे शोधता येते, असे डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी सांगितले. अध्यात्मवादी लोक डीएनएला आत्म्याची उपमा देऊन दिशाभूल करीत आहेत. याकडेही जोगळेकर यांनी लक्ष वेधले. प्रा. नीता शहा यांनी प्रास्ताविक, नेहा निरगुडकर यांनी सूत्रसंचालन तर अॅड. अंजली देसाई यांनी आभार मानले.