देहूरोड : पुणे-मुंबई महामार्गालगत शेलारवाडी जवळ अमरदेवी मंदिराच्या मागे डोंगरावर एकाने झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार मंदिराच्या पुजार्यामुळे उघडकीस आला. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास भिका सोनावणे (वय 38, अंबरवेट, पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरुन त्याची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले. डोंगरावरील महुच्या झाडाला नायलॉनच्या दोरीच्या साह्याने गळफास लावलेल्या अवस्थेत सोनावणे आढळून आला होता. मंदिराचे पुजारी वसंत गंगाधर जोशी यांनी याबाबत पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला बेशुध्दावस्थेत वायसीएम रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिस नाईक लांडे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.