जम्मू/श्रीनगर : भ्याड दशतावादी हल्ल्यानंतरही भाविकांनी अमरनाथ यात्रा सुरूच ठेवण्याचा निर्धार केल्यानंतर शनिवारी सकाळी लष्कराच्या कडेकोट बंदोबस्तात 3,398 यात्रेकरुंचा 16 वा जथ्था जम्मूहून रवाना झाला. त्यात 2,535 पुरूष, 758 महिला तसेच 100 साधू-साध्वी आणि 5 तृतीयपंथी यांचा समावेश आहे. दरम्यान, अमरनाथ यात्रेवरील हल्ला म्हणजे एक मोठी जखम असल्याची प्रतिक्रीया लष्कराने दिली आहे. आता दहशतवाद्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र केली असून काश्मीर खोऱ्यातील परीस्थिती नियंत्रणाखाली आहे, असे त्यानी सांगितले आहे.
चिनार कॉर्प कमांडर लेप्टनंट जनरल जे. एस. संधू यांनी सांगितले की, काश्मीरमधील स्थिती तितकी वाईट नाही. लष्कर हतबल नाही. काश्मीरी युवक आता लष्करात भरती होत आहेत. भारतीय लष्कराने चिंतीत व्हावे, अशी स्थिती नाही. तरीही अमरनाथ यात्रेवरील हल्ला पराभवाप्रमाणे जिव्हारी लागला, अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली.
एके-47 सह सैनिक बेपत्ता
बारामुल्ला जिल्ह्यातील गांटेमुल्ला कॅम्पमधून जहूर अहमद ठाकूर हा सैनिक 6 जुलै पासून एके-47 रायफलसह बेपत्ता आहे. तो अद्याप दहशतवाद्यांना जाऊन मिळालेला नाही, त्याच्या मागावर यंत्रणा आहेत, असे संधू यांनी सांगितले.
दहशतवाद्यांशी संबंध
पीडीपी आमदार ऐयाज अहमद मीर यांच्या चालकाला पोलिसांनी अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. तौसीफ अहमद असे या चालकाचे नाव आहे. त्याचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे समजते. याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांचे सहा सदस्यीय विशेष पथक तपास करत आहे.