जळगाव । काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी 10 रोजी रात्री अतिरेक्यांनी अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात सहा महिलांसह सात भाविकांचा मृत्यू झाला तर 32 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व भाविक गुजरात राज्यातील आहेत. अमरनाथचे दर्शन करून ते जम्मूकडे परतत होते. एरवी यात्रेकरूंची वाहने एकमेकांसोबत पोलिसांच्या सुरक्षेत प्रवास करत असतात, मात्र गुजरातच्या भाविकांची ही एकच बस प्रवास करत होती. रात्री 8.20 च्या सुमारास अनंतनाग जिल्ह्यातील बोटेंगू परिसरात अतिरेक्यांनी या बसवर हल्ला चढवला. या हल्ल्याच्या जळगाव जिल्ह्यातुन निषेध होत आहे. या दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर-ए- तोयबा आणि काश्मिरी हिजबुल या दोन संघटनेचा हात असल्याने त्यांचा निषेध व्यक्त होत आहे. तसेच भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील वाहनचालक समीर शेख गफूर यांनी जीवाची पर्वा न करता प्रवांशाचे जीव वाचविल्याने त्यांच्याप्रती आदर व्यक्त होत आहे.
समीर शेख यांना ‘सलाम’
कासोदा । मौलाना आझाद विचारमंचतर्फे या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. तर स्वतःच जीव धोक्यात घालून 48 प्रवाशांचे जीव वाचविणारा चालक सलीम शेख गफूर यांना आम्ही सलाम करतो असे पत्रक मौलाना आझाद विचारमंचने प्रसिद्धीस दिले आहे. या पत्रकावर जिल्हा संघटक नुरुद्दीन मुल्लाजी, एहसान अली, अन्वर मिस्तरी, मन्सुरखा तमीजखा, हमजेखान, नबीदादा, शेख रशीद, मुस्तकीम, जैनुलभाई, शेख रशीद शेख मसीद, जब्बार पठाण, यासीन पटवे, इफ्तेखार मुल्लाजी, मुबारक पटवे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
शिवसेनेतर्फे निषेध
एरंडोल । भाविकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्याचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी सुनिल मानुधने, प्रसाद दंडवते, प्रमोद महाजन, जगदीश पाटील, रेवानंद ठाकूर, शुभम जैस्वाल, आबा चौधरी, चेतन पाटील, आरिफ मिस्तरी, धीरज पाटील, संदीप सोनावणे, राहुल महाजन, भारत महाजन, नाना देशमुख, रवींद्र चौधरी, भूषण पाटील, सागर पाटील, आकाश पाटील, सुनील पवार आदी उपस्थित होते.
भडगावात निषेध
भडगाव । विश्व हिंदु परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध करीत काश्मीर घाटी अतिरेक्यांच्या तावडीतून मुक्त करायचा असेल तर काही दिवस हा प्रदेश आमच्या ताब्यात देणे आवश्यक आहे. तसेच देशभरात कुठेही अतिरेकी कारवायांना खतपाणी घालणार्या किंवा मदत करणार्या संघटना असतील तर त्यांना शोधून काढण्यासाठी कोम्बींग ऑपरेशन या मागणीसाठी बजरंग दलाच्यावतीने निवेदन देण्यात आले. मिलींद बारसे, दिपक पाटील, भूषण पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.