पालघर – अनंतनाग येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यात ७ भाविकांचा मृत्यू झाला. यात दोन जण महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील आहेत.
निर्मलाबेन ठाकोर आणि उषा सोनकर, अशी महाराष्ट्रातील मृतांची नावे आहेत. यातील एक महिला डहाणूतील आशागड येथील तर दुसरी डहाणू स्टेशन येथील आहे. तर या हल्ल्यातील जखमींमध्ये महाराष्ट्रातील ११ जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. भाविकांची ही बस गुजरातमधील वलसाडमधील ओम ट्रॅव्हल्सची असून या हल्ल्यात बस मालकाचा मुलगाही जखमी झाला आहे.
पालघरमधील ६ जण जखमी
या हल्ल्यात पालघरमधील डहाणू येथील कासा येथील रहिवासी, यशवंत डोंगरे आणि योगिता डोंगरे हे दाम्पत्यही गोळी लागल्याने जखमी झाले आहे. यशवंत यांच्या कंबरेला तर योगिता यांच्या पायाला गोळी लागली असल्याचे समजते. याशिवाय प्रकाश वजानी, भाग्यमनी ठाकूर, पुष्पा गोसावी आणि गिताबेन रावळ, असे एकूण ६ जण जखमी झाल्याचे समजते. या गाडीत डहाणूमधील २ पुरुष आणि १५ महिलांचा समावेश होता.
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या अमरनाथ यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी देशभरातून मोठ्यासंख्येने भाविक जात असतात. या यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे असते. मात्र यावर्षी दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लष्कराकडे यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.