नवी दिल्ली : मागील महिन्यात अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला हा दहशतवादीच होता, अन् तो लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी घडवून आणला होता. या हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू इस्माईल याचा होता, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक मुनीर खान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यात्रेकरूंच्या बसवर अंदाधुंद गोळीबार करणारे तीन दहशतवादी पोलिसांनी पकडले असून, त्यांची सखोल चौकशी सुरु आहे. हे तिघेही लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. सर्व हल्लेखोरांची ओळख पटली असून, मास्टरमाइंडसह इतर दहशतवाद्यांनाही लवकरच जेरबंद करू, असेही खान यांनी सांगितले.
बसवरील हल्ला पूर्वनियोजित!
पोलिस महासंचालकांच्या माहितीनुसार, 9 जुलैरोजी अशाप्रकारचा हल्ला करण्याचे नियोजन लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केले होते. परंतु, त्यांना सीआरपीएफ अथवा यात्रेकरूंचे कोणतेही वाहन त्या दिवशी मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी 10 जुलैरोजी गुजरातमधील यात्रेकरूंच्या वाहनाला लक्ष्य करत गोळीबार केला. यात्रेकरूंच्या वाहनासाठी शौकत तर सीआरपीएफच्या वाहनांसाठी बिलाल असा कोडही त्यांनी तयार केला होता, असेही मुनीर खान म्हणाले. या हल्लाप्रकरणी पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना जेरबंद केले असून, त्यात दोघे पाकिस्तानी तर एक काश्मिरी युवक आहे. अद्यापही तीन दहशतवादी फरार आहेत, त्यांनाही लवकरच पकडले जाईल. या दहशतवाद्यांना काही स्थानिक नागरिकांचीही साथ मिळाली. हा हल्ला पूर्णपणे पूर्वनियोजित होता, असेही खान यांनी स्पष्ट केले. ज्या बसवर हल्ला झाला ती अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे नोंदणीकृत नव्हती. त्यामुळे बससोबत सुरक्षा यंत्रणा नव्हती. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांसह जखमींना मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी भेट देऊन धीर दिला होता.
अबू दुजानाच्या जागी इस्माईलची वर्णी?
लष्कर-ए-तोयबाच्या मास्टरमाइंड अबू इस्माईल यानेच या हल्ल्याचे नियोजन केले होते. त्यामुळे त्याच्या शोधासाठी भारतीय सैन्यदल आणि जम्मू-काश्मीर पोलिस प्रयत्न करत आहेत. भारतीय जवानांनी नुकतेच लष्करचा कमांडर अबू दुजाना याचा खात्मा केला होता. दुजाना याच्यानंतर याच अबू इस्माईल याच्याकडे लष्करची सूत्रे दिली जाणार आहेत. इस्माईल हा पाकिस्तानी नागरिक असून, मागील तीन वर्षापासून काश्मीर खोर्यात सक्रीय आहे. सद्या तो दक्षिण काश्मीरचा कमांडर आहे. पंपोर दहशतवादी हल्ल्यासह विविध हल्ल्यांत त्याचा सहभाग राहिलेला आहे. काश्मीर येथे नोटाबंदीनंतर एटीएम लुटून नेण्याचा प्रकारही त्यानेच केला होता, अशी माहितीही लष्करी गुप्तचर सूत्राने दिली आहे.