मोखाडा: तालूक्यात सर्वत्र खुरासणीच्या नगदी पिकावर अमरवेलींचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. तथापी किटक नाशकांशिवाय ईतर पीकसंरक्षक औषधे तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकर्यांची मोठी अडचण झाली आहे. मोखाडा तालुक्यात उपजिवीकेच्या पिकांबरोबरच नगदी पिकांचीही मुबलक लागवड केली जाते. मोखाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तननाशक औषध उपलब्ध नसल्याचे या कार्यालयांकडून सांगण्यांत आले आहे.
या औषधाच्या फवारणीनंतरच अमरवेलीचा नाश होणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. मात्र हे औषध खरेदी करण्याचे अधिकार जिल्हापरिषदेला असल्याचे मोखाडा पंचायत समितीकडून स्पष्ट करण्यांत आले आहे. भात, नागली, उडीत या उपजिवीकेच्या पिकांबरोबरच खुरासणी आणि वरई ही उत्पन्न देणारी नगदी पिकेही मोठ्या प्रमाणावर लागवड केली जातात परंतू खुरासणी पिकावरील अमरवेलींच्या प्रादूर्भावाने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.
शेतात खुरासणीवर अमरवेलींचे जाळे पसरले आहे. त्यामूळे पिकांची वाढ खुंटली असून मरतुकीचे प्रमाण वाढले आहे. पालघर जिल्हापरिषद तथा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने त्याची दखल घेवून अमरवेलीच्या उद्भवाला अटकाव करणारी औषधी तात्काळ उपलब्ध करून द्यावीत.
जितेंद्र किसन हमरे
शेतकरी,खोडाळा