मुंबईतील निवडणुकीसाठी पैसा नेला जात असल्याचा संशय ; आयकर विभागाकडून कसून तपासणी
भुसावळ- मुंबईतील निवडणुकांसाठी अमरावतीहून हवालामार्गे नेली जात असलेली 43 लाखांची रोकड रेल्वे सुरक्षा बलाच्या गस्ती पथकाने पकडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अमरावतीसह अकोल्याच्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून रेल्वे सुरक्षा बलासह आयकर विभागाकडून याबाबत कसून चौकशी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. अप विदर्भ एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणार्या दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने रेल्वे सुरक्षा बलाने केलेल्या तपासणीत 43 लाखांच्या रोकडसह सात लाखांचे दागिने आढळल्याने दोघाही प्रवाशांना नाशिक रोड स्थानकावर शनिवारी पहाटे उतरवण्यात आले.
52 लाखांचा ऐवज जप्त ; आयकरकडून कसून चौकशी
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रेल्वेतून हवालामार्गे मोठ्या प्रमाणावर मद्यासह रोकड नेली जात असल्याने रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त अजयकुमार दुबे यांनी दोन गस्ती पथके तैनात केली आहेत असून पथकातील दोघा कर्मचार्यांना शनिवारी रात्री मुंबईकडे जाणार्या नागपूर-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमधील दोन प्रवाशांची हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी नरेंद्र जबमनील (40, रा.अमरावती) व गोपाळ नरेंद्र पचरिया (23, अकोला) या दोघांच्या बॅगा मनमाड ते नाशिक स्थानकादरम्यान तपासल्यानंतर त्यात 43 लाख 76 हजार 500 रुपयांची रोकड तसेच सात लाख 61 हजार 446 रुपये किंमतीचे दागिणे असा 52 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरपीएफच्या वरीष्ठ अधिकार्यांना याबाबत कल्पना दिल्यानंतर ही रक्कम मुंबईत निवडणुकीसाठी हवालामार्गे नेला जात असल्याचा संशय असल्याने आयकर विभागाच्या अधिकार्यांना तसेच निवडणूक आयोगालाही याबाबत कल्पना देण्यात आली. दरम्यान, आयकर विभागाकडून उभयंतांची कसून चौकशी केली जात असून त्यांनी रक्कम नेमकी कुठून कुणाला देण्यासाठी जात असल्याबाबत विचारणा केली आहे.