अमरावती । सार्वजनिक गणेशोत्सव व आगामी सणासुदीच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमरावती शहराचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक रस्त्यावर उतरले आहेत. नागपुरी गेट परिसरातील गस्तीनंतर पोलीस आयुक्तांनी रात्री अचानक दस्तुरनगर मार्गावरील चार बिअर बारची तपासणी केली. त्यामुळे बारमालकांसोबतच तळीरामांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सध्या सुरु असलेला गणेशोत्सव व आगामी बकरी ईदसह अन्य सणांच्या पार्श्वभूमिवर शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात येत आहे.
रेकॉर्डवरील आरोपींवर कारवाई सुरु असून शहरात पोलिसांची गस्त व नाकाबंदीही वाढविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्त रात्री स्वत: रस्त्यावर उतरुन गस्त घालत आहेत. बारची तपासणी करत असतानाच बारमधून रेकॉर्डवरील पाच आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले. अत्यावस्त पार्किंग व परमिट रुमशिवाय दारू पिणे आदी प्रकार आढळून आल्याने बारमालकांची कानउघाडणी करण्यात आली.