चंदीगड : पंजाबमध्ये काँग्रेस नेते कॅप्टन अमरेंद्र सिंह यांनी गुरूवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर सर्वाधिक चर्चेत असलेले नवज्योत सिंह सिध्दू यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. सिध्दू यांनी बह्म मोहिंद्र यांच्यानंतर शपथ घेतली. तसेच मनप्रीत सिंह बादल, साधु सिंह, तृप्त रजिंदर सिंह बाजवा, राणा गुरजीत सिंह, परगट सिंह, रजिया सुल्ताना, ओपी सोनी यांच्यासह काही नवनिर्वाचित आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल व्ही. जी. सिंह बदनौर यांनी राजभवनमध्ये सिंह आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना शपथ दिली. पंजाब विधानसभेत काँग्रेसचे 77 आमदार आहेत. या शपथग्रहण सोहळ्याला माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, राहुल गांधी, राज बब्बर, नवीन जिंदाल, राजीव शुक्ला, ज्योती सिंधिया, प्रताप बाजवा आदि नेते उपस्थित होते.
सरकारपढे आव्हाने
कॅप्टन अमरेंद्र सिंह यांच्या सरकारसमोर सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अनेक आव्हाने असणार आहेत. अर्थिक संकट, बेरोजगारी, अमली पदार्थ आणि नशेच्या आहारी गेलेले पीढी, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. सध्या पंजाब सरकारवर 1.25 लाख करोडचे कर्ज आहे. हे कर्ज अनेक वर्षांपासून वाढतच चालले आहे.