अमलथे गावात घरांची पडझड ; मांजरे शिवारात मेंढ्या दगावल्या

नंदुरबार – दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे गारठा निर्माण होऊन तालुक्यातील मांजरे गावात 15 मेंढ्यांचा मृत्यू झाला तर रिपरिप सुरू असल्याने अमळथे येथे तीन कच्या घरांची पडझड झाल्याची घटना घडली आहे.

शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने त्याचा जनजीवणावर परिणाम होतांना दिसत आहे. बुधवार पासून सुरू झालेला पाऊस गुरुवारी सायंकाळ पर्यंत कायम होता. त्यामुळे तालुक्यातील अमळथे येथील तीन कच्या मातीच्या घरांची पडझड झालेली आहे त्यात किती नुकसान झाले याबाबत महसूल विभागाकडून माहिती मिळाली नाही.

अवकाळी पाऊस सुरू असल्याने प्रचंड प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे शहराला जणू काश्मीर सारखे स्वरूप आले असून रेनकोट घालावा की स्वेटर घालावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवकाळी पावसाने तालुक्यातील मांजरे गावातील ठेलारी बांधवांच्या 15 मेंढ्या दगावल्या आहेत. रब्बी हंगामातील पिकांचे देखील नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पथारावरील वाळीत घातलेल्या मिरच्यांचे देखील नुकसान झाले आहे. तिसऱ्या दिवशी शुक्रवारी सूर्यदर्शन झाल्याने थोड्याफार प्रमाणात ऊब मिळाली आहे.