मुंबई:- राज्यात विदेशी नागरिक आणि शेजारील राज्यांमधून अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असून शाळा महाविद्यालयांच्या बाहेर खुलेआम अमली पदार्थ मिळत असल्याने तरुणाई व्यसनाधीन बनत चालली असून सरकारी यंत्रणा कुचकामी असून अशा गुन्हयांमध्ये पोलिसांचे लागेबांधे असल्याचा आरोप विरोधी पक्षाने लावत यावर कडक कारवाई करत कठोर पावले उचलण्याची मागणी केली. मुंबई पोलिसांच्या एलसीबी पथकाने नुकतेच अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या गुलाम हुसेन आझाद याला अटक केल्याबाबत लक्षवेधीवर विधानसभेत जोरदार चर्चा झाली. यावेळी अजित पवार यांनी हा प्रकार गंभीर असून केंद्राबरोबरच राज्य सरकारला यासाठी वेगळा कायदा करण्याची गरज असल्याचे सांगत पर्यायी व्यवस्था तयार करण्याची मागणी केली. त्यांनी कायदे कडक केल्याशिवाय हे प्रकार कमी होणार नसल्याचे सांगितले. यावर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यासाठी विशेष अध्ययन करून 15 ते 20 वर्षाच्या शिक्षा देण्याची तरतूद करण्याविषयी आश्वस्त केले.
‘म्याव-म्याव’ची चर्चा
सध्या बाजारात म्याव-म्याव नावाचा अमली पदार्थ मिळत असून यावर कारवाईसाठी तो लिस्टिंगमध्ये नसल्याचे बाबुराव पाचर्णे यांनी सांगितले. मात्र म्याव-म्याव हे एमडी ड्रग्ज एनडीपीएसच्या ऍक्ट अंतर्गत आल्याचे सांगत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी यासाठी 10 वर्ष शिक्षेची तरतूद असल्याचे देखील सांगितले. यासाठी सॉफ्ट टार्गेट असलेले विद्यार्थी व तरुणांचे कोम्बिंग ऑपरेशन करून कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकात जाऊन कारवाई
हे ड्रग्ज असल्याची माहिती मिळताच कारवाई महाराष्ट्र पोलिसांकडून केली जात आहे. कर्नाटकमध्ये जाऊन देखील महाराष्ट्र पोलिसांनी केमिकल जप्त केले असून लिकेजेस ब्रेक करण्याचे काम सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितले.
विदेशी लोकांचा सहभाग!
या रॅकेटमध्ये नायजेरियन लोकांचा थेट संबंध असल्याचा आरोप विखे पाटील यांनी लावला. तसेच या लोकांचा संबंध आढळून आल्यास त्यांना देशाबाहेर लावणार का? असा प्रश्न विचारला. यावर गृहराज्यमंत्री पाटील यांनी स्पेशली अमली पदार्थाच्या तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी 5 युनिट प्रभावित ठिकाणी लावलेले असून यासाठी वेगळे पोलीस स्टेशन स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली. बाहेरील नागरिकांचा समावेश असेल तर त्याचा सर्वे करून कारवाई करण्याचे त्यांनी सांगितले.