विरार । वसई, नालासोपारा व विरार शहरात अंमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असून त्यात अल्पवयीन व तरूण मूले व्यसनाधीन होत असल्याचे पहायला मिळत होते. अशा अंमली पदार्थांची विक्री करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पालघर पोलीस अधिक्षक मंजूनाथ सिंगे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने नालासोपारा पोलीसांनी अंमली पदार्थ विक्री करणार्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली होती. सोमवारी नालासोपारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार आपल्या पोलीस पथकाच्या साहाय्याने सहाय्यक निरीक्षक प्रताप दराडे यांनी हनुमाननगर परिसरात सापळा रचला असता महिंद्रा झायलो गाडीतून आलेल्या इत्तेश्याम रफीक अन्सारी याला ताब्यात घेतले.
सहा लाखांचा साठा हस्तगत
यावेळी गाडीची झडती घेतली असता दिड किलो ग्रॅम वजनाचा गांजा, २४ ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर, कफ सिरपच्या ६६ बाटल्या, गोळ्यांच्या ५८ स्ट्रिप्स व रोख रक्कम असा एकूण ५ लाख ९८ हजार ७२० रूपये किमतीचा अंमली पदार्थ्यांचा साठा हस्तगत केला. इत्तेशाम अन्सारी याच्याविरूद्ध नालासोपारा पोलीस ठाण्यात कलम ८ (क) ,२०,२१,२२ व २५ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन व उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता तोटेवाड यांनी अंमली पदार्थ विक्री करणार्यांवर चाप बनविण्यासाठी नालासोपारा पोलीस निरीक्षक भरत जाधव यांना स्पेशल पथक तयार करून अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक प्रताप दराडे करीत आहेत.