दै.जनशक्तिशी बोलतांना दिली माहिती
अमळनेर – अमळनेरचे अपक्ष आमदार शिरीष चौधरी हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. लोकसभा लढविण्याचा निर्णय निश्चित केला असल्याची माहिती खुद्द आ.शिरीष चौधरी यांनी दै.जनशक्तिशी बोलतांना दिली.
जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार आ.स्मिता वाघ यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच या मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहे.
भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांचे तिकीट कापून आ.स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. खासदार ए.टी.पाटील यांनी या उमेदवारीवरुन जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन व जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान या मतदारसंघात आ.स्मिता वाघ व गुलाबराव देवकर यांच्यात सरळ लढत मानली जात होती. मात्र जळगाव लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिरीष चौधरींचा निर्धार
अमळनेरचे अपक्ष आ.शिरीष चौधरी यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याविषयी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. कार्यकर्त्यांनी आ.शिरीष चौधरी यांना लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी पाठिंबा दिला आहे. दरम्यान कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर जळगाव लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अपक्ष आ.शिरीष चौधरी यांनी दै.जनशक्तिशी बोलतांना दिली.