अमळनेर। अमळनेर नगरपरिषदेत सत्ताधारी गटाने सत्तेचा गैरवापर करून अतिक्रमण मोहीम स्थगितीचा ठराव केल्याचा आधार घेत आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीचे गटनेते प्रवीण पाठक, उपनेत्या सविता संदानशिव, प्रतोद सलिम टोपी यांनी नगराध्यक्षा व सत्ताधारी नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
हस्तक्षेपाचा अधिकार नाही
उपविभागीय अधिकारी व न.प. मुख्याधिकार्यांनी अतिक्रमण, बेकायदा बांधकाम हटविण्याची योजना तयार केली होती. नंतर अतिक्रमण हटविण्याचे आदेश नगराध्यक्षा यांनी दिले. मात्र, अचानक 11एप्रिलला स्थायी समिती सभेत ही मोहीम स्थगित करण्यासाठी ठराव घेण्यात आला. या ठरावाला प्रवीण पाठक यांनी लेखी विरोध केला होता.वास्तविक अतिक्रमण मोहीम कारवाई थांबविण्याबाबत ठराव करण्याचा कुठलाही अधिकार स्थायी समितीस नाही. नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील व 22 नगरसेवकांनी अधिकाराचा गैरफायदा घेत कायद्याचा भंग केला आहे. 15 एप्रिलला तातडीची सभा बोलावत अतिक्रमण हटाव योजनेस तहकूबी देण्यात आली. वास्तविक या मोहिमेविरुद्ध ठराव अथवा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नगरपरिषद सदस्यांना नाही.