गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुस बाजारपेठ पोलिसांकडून जप्त ; खुनातील संशयीत विनोद चावरीया मात्र पसार होण्यात यशस्वी
भुसावळ- चोरी, दरोड्यासह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, हाणामारी व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अमळनेर व नंदुरबार लोहमार्ग पोलिसांना वॉण्टेड व पोलिस दप्तरी कुविख्यात असलेल्या आरोपी राकेश वसंत चव्हाण (30, अमळनेर) याच्या मुसक्या आवळण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे मात्र त्याचा सोबत असलेला व भुसावळातील रेल्वे कर्मचार्याच्या खुनातील आरोपी विनोद चावरीया मात्र पसार होण्यात यशस्वी झाला. दरम्यान, आरोपी राकेश चव्हाणच्या ताब्यातून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे समाजमनातून स्वागत होत आहे.
फिल्मी स्टाईल पाठलाग करून आवळल्या मुसक्या
वॉण्टेड आरोपी राकेश चव्हाण व विनोद चावरीया हे शहरातील पंढरीनाथ नगर भागात घरफोडीच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला. शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पंढरीनाथ नगर भागात दोन इसम पायी जाताना दिसल्यानंतर पोलिसांनी त्यांना थांबण्याच्या सूचना केल्या मात्र पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढल्यानंतर राकेश चव्हाण यास पकडण्यात यश आले मात्र दुसरा साथीदार व रेल्वे कर्मचार्याच्या खुनातील संशयीत आरोपी विनोद चावरीया मात्र रात्रीच्या अंधाराचा व गल्ली-बोळाचा फायदा घेवून पसार होण्यात यशस्वी झाला.
यांच्या पथकाने केली कारवाई
पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अंबादास पाथरवट, सुनील थोरात, दीपक जाधव, नरेंद्र चौधरी, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, राहुल चौधरी, बापुराव बडगुजर आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांवरच रोखला कट्टा
पंढरीनाथ नगरात पोलिस दाखल झाल्याचा आरोपींना सुगावा लागताच राकेश चव्हाण हा पळू लागल्यानंतर पोलिस नाईक दीपक जाधव, कृष्णा देशमुख आदींनी त्याचा पाठलाग करताच संशयीत दोन ठिकाणी पडल्यानंतर तो पुन्हा उठून उभा राहिला व त्याने आपल्याजवळील कट्टा कॉन्स्टेबल श्रीकृष्ण देशमुख यांच्यावर रोखत, तेथेच थांबा नाही, जीवे ठार मारेल, अशी धमकीही दिली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करीत राकेश वसंत चव्हाण (30, रा.बंगाली फाईल, प्रताप कॉलेजजवळ, अमळनेर) याचा मुसक्या आवळल्या. आरोपीच्या ताब्यातून पाच हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व एक हजार रुपये किंमतीचे दोन काडतूस जप्त करण्यात आले.
आरोपी चव्हाण नऊ महिन्यांपासून वॉण्टेड
आरोपी राकेश वसंत चव्हाणविरुद्ध अमळनेरसह नंदुरबार लोहमार्ग पोलिसात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत शिवाय गेल्या नऊ महिन्यांपासून त्याचा पोलिसांकडून कसोशीने शोध सुरू होता मात्र आरोपी गवसत नव्हता. आरोपीविरुद्ध अमळनेर पोलिसात दरोडा, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, आर्म अॅक्ट, चोरी, लूट तसेच नंदुरबार लोहमार्ग दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
विनोद चावरीयावर गोळीबार करून खुनाचा आरोप
पंढरीनाथ नगरातून पसार झालेला आरोपी विनोद चावरीयाविरुद्ध शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे तर आरोपी चावरीयासह बॉबीसिंग विरेंद्रसिंग ठाकूर (44) यांनी कुठल्यातरी कारणातून मंगळवर, 9 एप्रिल रोजी रेल्वेच्या दहा बंगला भागातील रेल्वे कर्मचारी याकूब डॅनियल जॉर्ज (37) यांच्यावर गोळीबार करून खुन केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात बॉबीसिंग यास अटक करण्यात आली आहे मात्र चावरीया पसार असल्याने त्याचा कसून शोध सुरू आहे.
आरोपी चव्हाणचा अमळनेर पोलिस घेणार ताबा
आरोपी चव्हाण व चावरीयाविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर अटकेतील चव्हाण यास शनिवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, आरोपी अमळनेर पोलिसांना वॉण्टेड असल्याने त्याचा न्यायालयाच्या परवानगीनंतर ताबा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.