अमळनेर । शहरातील ताडेपुरा तसेच विविध ठिकाणी सुरू असलेले अवैध दारूविक्री व अवैध धंदे बंद करण्यात यावे. यासाठी ताडेपुरा भागातील सुमारे शंभराहून अधिक महिलांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मगन लोणारी, विनोद शिंदे, दर्शन पाटील, अनिल धनगर, पवन पाटील, राकेश पाटील, मंगल मोरे, योगेश हटकर, प्रविण पाटील, प्रविण धनगर, संजय भिल, विनोद सोनार, मंगल सोनवणे, अशोक नाईक, समाधान मिस्त्री, राजेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.
मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयात येत असताना महिलांनी आपल्या व्यथा व समस्या माजी आमदार साहेबराव पाटील व अनिल पाटील यांच्या समोर कथित केल्यानंतर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांची भेट घेऊन महिलांनी त्यांना आपल्या अडचणी सांगितल्या.
काय म्हटले आहे निवेदनात?
शहरातील ताडेपुरा भागात सट्टा, मटका, जुगार, गांजा, भांग तसेच अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू असुन अवैध धंदे करणारी मंडळी राजकीय वरदहस्त डोक्यावर असल्याने बिनधास्त आहेत. एकीकडे महाराष्ट्रभर प्रतीपंढरपुर म्हणून ओळखले जाणारे अमळनेर शहर अशा समाजकंटकांमुळे बदनाम होत आहे. नवीन अनोळखी व्यक्तीस अवैध धंदे करणार्या व्यावसायिकांकडुन लुबाडले जाते. पोलिसात वारंवार तक्रारी करुन देखील कुठल्याही प्रकारची दखल मात्र घेतली जात नाही. म्हणून शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ताडेपुरा परिसरातील शंभराहून अधिक महिला पुरुषांनी अवैध व्यावसायिकांच्या विरोधात दुपारी दोन वाजता ताडेपुरा ते प्रांताधिकारी कार्यालय असा मुकमोर्चा काढला.