अमळनेरातील बाबा बोहरी प्रकरणातील दोन संशयीत गुन्हे शाखेच्या जाळ्यात

0

17 दिवसात खुनाचा उलगडा ; पैशांच्या कारणातून हत्या झाल्याचे उघड

अमळनेर- शहरातील बाबा बोहरी उर्फ अली अजगर बोहरी (54, न्यू प्लॉट, अमळनेर) यांच्या खुनाचा उलगडा करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या प्रकरणी नाशिकमधून दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून अन्य दोघे मात्र पसार आहेत. तब्बल 17 दिवसांपासून पोलीस आरोपींच्या मागावर होती. सुरुवातीला या खुनात राज चव्हाण या संशयीताचे नाव पुढे आले होते मात्र या गुन्ह्यात दुसरेच संशयीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

संशयीतांना नाशिकमधून सापळा रचून केली अटक
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकमधून दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या तर अन्य दोघे संशयीत पसार असून त्यांचा शोध सुरू असल्याने निरीक्षक कुराडे यांनी सांगितले.

घात लावून केली बाबा बोहरींची हत्या
गुरुवार, 3 मे रात्री 11 वाजून 47 मिनिटांनी पंपावरून हिशोब करून घराकडे निघालेल्या बाबा बोहरी यांच्यावर उद्यानाजवळ दबा धरून बसलेल्या तीन ते चार मारेकर्‍यातील एकाने जवळून गोळी झाडली तर छातीच्या डाव्या बरगडीत ही गोळी शिरल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, तत्पूर्वी जखमी अवस्थेत बोहरी यांनी दुचाकी चालवून पेट्रोल पंप गाठत कर्मचार्‍यांना पाणी मागितले व आपल्याला गोळी लागल्याचे सांगितले होते. जखमी अवस्थेत त्यांना खाजगी रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळेत त्यांचा मृत्यू झाला होता.

पैसे न दिल्यानेच केली हत्या
गुरुवारी रात्री हॉटेलमध्ये बसलेल्या बोहरी यांच्याकडे संशयीतांनी पैशांच मागणी केली होती मात्र पैसे न दिल्याने आरोपींनी कट रचत बोहरींची हत्या घडवून आणली. खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार, गुन्ह्यातील चौघा आरोपींनी बोहरींच्या पेट्रोल पंपावर तीन महिन्यापूर्वी दरोडा टाकत सुमारे आठ लाखांची त्यावेळी रोकड लांबवली होती व त्याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हादेखील दाखल आहेत. गुन्हे शाखेला या खुनाचा उलगडा करण्यात यश आल्याने समाधान व्यक्त होत आहे.