प्रसिद्ध शायर राहत इंदोरी म्हणतात, ‘सरहदों पर तनाव हैं क्या? जरा पता तो करो चुनाव हैं क्या’? अशा परिस्थितीला जरी वर्षभराचा कालावधी असला, तरी जळगाव जिल्ह्यात वातावरणनिर्मिती सुरू झाली आहे. या वातावरणनिर्मितीचा नारळ फुटला तो अमळनेरात. एका रात्रीतून उमेदवार फायनल होतात, तेव्हा आतापासून निवडणुकांचे अंदाज बांधणे थोडे घाईचे होईल. असे असले तरी काही चित्र मात्र स्पष्ट होताना दिसत आहे. त्यात अमळनेरात विधानसभा उमेदवारीवरून रणकंदन पेटेल व या मतदारसंघात तिकीट वाटप हा मोठा सोहळा होईल, ज्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असेल.
अपक्ष म्हणून निवडून आलेले व नंतर राष्ट्रवादीकडून लढलेले माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा तसा औपचारिक होता. मात्र, त्यांच्या प्रवेशामुळे अमळनेरातील भाजपमध्ये प्रस्थापित-विस्थापित (पक्ष सोडावे लागलेले, सोडलेले) वाद उफाळून येण्याची दाट शक्यता यानिमित्ताने निर्माण झाली आहे. ‘आताची महाराष्ट्राची परिस्थिती बघता त्या परिस्थिती जोपर्यंत आम्ही स्वतःच्या भरवशावर निवडून येत नाही तोपर्यंत विविध लोकांना सोबत घेऊन चालणे याशिवाय आम्हाला पर्याय नाही.‘हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एका कार्यक्रमातील वक्तव्य. नारायण राणेंना का घेताय? या प्रश्नाला त्यांचे हे उत्तर होते. परंतु, भाजप सर्वांना पक्षात घेऊन विरोधकच संपवतेय का? असा प्रश्न अमळनेरातील प्रकारानेही यानिमित्ताने समोर येतोय. अमळनेरात भाजप सोडून दुसरा मोठा पक्ष तो म्हणजे राष्ट्रवादी या राष्ट्रवादी काँग्रेसचे चेहरा म्हणून माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील पुढे आले. आता ते भाजपमध्ये दाखल झालेत. नगराध्यक्षा पुष्पलता पाटील या भाजपमध्ये गेल्यानंतर साहेबराव पाटील भाजपमध्ये जातील असा अंदाज बांधल्या जात होता, त्यामुळे हा आता झालेला प्रवेश हा औपचारिक होता. या प्रवेशाला केवळ निमित्त हवे होते. ते विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे मिळाले. साहेबराव पाटील यांनी ज्या व्यासपीठावर भाजपमध्ये प्रवेश केला, त्या व्यासपीठावर विद्यमान आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते. साहेबराव पाटील यांचा पराभव करून अपक्ष म्हणून निवडून आलेले शिरीष चौधरी भाजपचे सहयोगी सदस्य आधीच आहेत. नगरपालिका निवडणुकीतही साहेबराव पाटील व शिरीष चौधरी यांचा राजकीय सामना सर्वांनी अनुभवला आहे. आता अमळनेरची वैशिष्ट्य बघा, गेल्या दोन निवडणुकांमध्ये येथील मतदारांनी पक्षाला नाकारले आहे. पहिले असे की, अनिलभाईदास पाटील हे भाजपकडून लढले होते, तेव्हा कृषिभूषण साहेबराव पाटील अपक्ष लढले होेते. अपक्ष म्हणून साहेबराव पाटील यांना मतदारांनी पसंती दिली. मात्र, याच साहेबराव पाटील यांना राष्ट्रवादीकडून निवडणूक लढल्यानंतर मतदारांनी त्यांना नाकारत पुन्हा अपक्षांना साथ दिली. दोनही निवडणुकीत भाजपला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
ज्या अनिलभाईदास पाटील यांना पराभवानंतरही भाजपने उमेदवारी दिली ते आता राष्ट्रवादीत आहेत. अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार शिरीष चौधरी भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. त्यामुळे अमळनेरात सध्या मोठी राजकीय खिचडी झाली आहे. ती कोणाला पचतेय याकडे सर्वांचे लक्ष असेल. आता वातावरण शांत वाटत असले, तरी साहेबराव पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश आधीच्या भाजपवासीयांना किती रुचला असेल, हा एक प्रश्न आहे. कारण भाजप सध्या प्रस्थापितांना ताटकळत ठेवत नव्याने पक्षात आलेल्यांना संधी देणारा पक्ष म्हणून समोर येतोय. भाजपच्या प्रस्थापित विस्थापित वादाचे ताजे उदाहरण विधान परिषद निवडणूक होय. शिवाय नारायण राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेशाचा प्रश्न भिजत पडला असला, तरी त्यांना मंत्री म्हणून घेऊच अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्र्यांनी वारंवार दिलीय, राणेंच्या बद्दल ज्यापद्धतीने स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देताय, त्याच्या अगदी उलट माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याबाबतीत प्रस्थापित व विस्थापित म्हणून ते विषय टाळतात. त्यामुळे भाजप आगामी काळात इलेक्टिव्ह मेरिट तपासून नवीन आलेल्यांना संधी देऊन अनेक प्रस्थापितांना धक्का देईल असा अंदाज बांधता येऊ शकतो. अशा परिस्थितीत अमळनेरातील वातावरण हाताळताना पक्षश्रेष्ठींना थोडी कसरत तर करावी लागणार आहे, अस असताना अमळनेरात बंडखोरीची शक्यता जास्त आहे.
साहेबराव पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे इतर मतदारसंघापेक्षा अमळनेरात विधानसभेचे तिकीट वाटप हा मोठा सोहळा ठरेल, ज्याकडे संपूर्ण जिल्ह्याचेच नव्हे राज्याचे लक्ष असेल. अमळनेरात जे दिग्गज आहेत सर्व भाजपमध्ये समाविष्ट आहेत. त्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी व आता माजी आमदार साहेबराव पाटील. जे आधी भाजपमध्ये होते ते आता राष्ट्रवादीत आहे. अशा परिस्थितीत कोण लोकसभा लढेल, कोण विधानसभा लढेल किंवा सर्वच विधानसभेसाठी इच्छुक असतील, या प्रश्नांची उत्तरे शोधायला गेले तरी आजी माजी आमदारांच्या उमेदवारीबद्दल मोठा गहन प्रश्न निर्माण होताना येथे दिसतोय. साहेबराव पाटील यांच्या प्रवेशामुळे आमदार शिरीष चौघरी यांची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे. कारण नगरपालिका निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. याव्यतिरिक्त नंदुरबारात त्यांचे बंधु डॉ. रवींद्र चौधरी भाजपकडून लढले व पराभूत झाले. त्यामुळे या दोन पराभव व आगामी निवडणूक अशी त्यांची भूमिका काय असेल हेही या ठिकाणी महत्त्वाचे ठरते. त्यामुळे गेल्या निवडणुकीत आमदारकीसाठी लढलेल्या आजी-माजी आमदारांचा आता उमेदवारीवरून सामना होईल का ? भाजप तो कसा हाताळेल? कोणाला उमेदवारी मिळेल? उमेदवारी देताना भाजपमधीलच दोन गटांचे निर्णय काय असतील? असे असंख्य प्रश्न यानिमित्त समोर आले आहे. यानिमित्ताने जिल्हाभरात निवडणुकांची काहीशी वातावरणनिर्मितीही झाली आहे.
-आनंद सुरवाडे
उपसंपादक जनशक्ति, जळगाव
9561041018