अमळनेर । पोर्टेबल फ्लूरोसेन्स रीडर स्पेक्ट्रोफ्लोरिमीटर विकासाच्या अभिनव संशोधन प्रकल्पासाठी विवेक भास्कर बोरसे यांना 2016-17चा उत्कृष्ठ विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामुळे त्यांचा सत्कार डी.ए.धनगर, आत्माराम देसले, रमेश सैंदाणे, हिंमतराव सोनवणे यांनी केला. विवेक यांनी बायोमेडिकल अभियांत्रिकी विषयात आयआयटी बॉम्बेतून नुकतीच पीएच.डी. पूर्ण केली आहे. विवेक बोरसे यांचे हे संशोधन मार्च महिन्यात राष्ट्रपती भवनातील प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. विवेक बोरसे हे भारत संचार निगम लिमिटेडचे भास्करराव बोरसे यांचे चिरंजीव आहेत. या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सदर पुरस्कार ’लायन्स क्लब ऑफ नॉर्थ बॉम्बे’ या मुंबईतील आघाडीच्या व प्रतिष्ठित संस्थेकडून दिला जातो.
समाज उपयोगी उपकरण तयार करणार्या विद्यार्थ्यांना पुरस्कार
समाज उपयोगी वैज्ञानिक उपकरणे विकसित करणार्या विद्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला जातो. अतिशय कठीण निकष असलेल्या या पुरस्कारासाठी संस्थेतर्फे संपूर्ण भारतातून निवेदन मागवण्यात येतात. अभियांत्रिकी, कृषि, विज्ञान, औषध आणि वैद्यकीय शास्त्र इत्यादी कोणत्याही क्षेत्रातून निवेदन करता येऊ शकते. प्रकल्पाच्या वैज्ञानिक आणि वैद्यकीय कामकाजातील सुलभता या निकषावरून विवेक बोरसे यांना हा पुरस्कार मिळाला. विवेक बोरसे यांचे हे संशोधन कार्य पूर्ण झालेले आहे आणि पॅथॉलॉजी चाचण्यांचे काम सुरु आहे. परदेशातून आयात करता येणार्या पण अतिशय महाग असणार्या स्पेक्ट्रोफ्लोरिमीटरला पर्याय म्हणून विवेक यांचे हे संशोधन उपयोगी ठरेल.