अमळनेरातील शिक्षकाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा

0

अपर पोलीस अधीक्षकांनी केले जागेची पाहणी

अमळनेर :- अमळनेरच्या जय योगेश्‍वर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक डी.डी.पाटील यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना 4 रोजी पहाटे घडली होती. या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा अज्ञात आरोपीविरुद्ध अमळनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी घटनास्थळी भेट दिली.

मयत पाटील यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळल्यानंतर पोलिसांना आता शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे तसेच पाटील यांच्या भ्रमणध्वनीवर कुणा-कुणाचे कॉल आले याबाबतही पोलिसांकडून माहिती संकलीत केली जात आहे. त्यांच्या खिशातील पाकिट व दुचाकीदेखील गायब झाली आहे. दरम्यान, अपर अधीक्षक बच्छाव म्हणाले की, खुनाचा गुन्हा दाखल असून या संदर्भात तपास सुरू आहे. लवकरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, असा विश्‍वास त्यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना व्यक्त केला.