अमळनेरातील स्मशानभूमीतून अस्थींची चोरी

0

अमळनेर। शहरातील स्मशानभूमीतून महिलेची अस्थि चोरीस गेल्याची घटना रविवारी 4 रोजी सकाळी उघडकीस आली. मयत महिलेच्या नातेवाईकांनी चोपडा रोडवरील स्मशानभूमीतच ठिय्या मांडला. मीनाक्षी नंदकुमार मालुसरे यांच्यावर 3 रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी नातेवाईकांनी प्रेत व्यवस्थित जळाले की नाही हे तपासले असता अस्थी व्यवस्थित होत्या. मात्र रविवारी सकाळी मुलगा प्रशांत मालुसरे व नातेवाईक अस्थी घेण्यासाठी आले असता अस्थी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. त्यामुळे विधी खोळंबला.

अखेरीस नातेवाईक आणि महिलांनी स्मशानभूमीतच ठिय्या आंदोलन सुरू केले. याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली आहे. प्रेता वरील दागिने चोरण्यासाठी अस्थि चोरुन नेले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलांचे कानातले , नाकातले आणि पायातील जोडवे चोरण्यासाठी या अस्थी भुरटे चोर नेत असल्याचे परिसरातील नागरिकांकडून समजते. नगरपालिकेने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावेत अशी मागणी होत आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील, भटुसिंग तोमर यांनी पाहणी केली. दोन संशयितांचे नाव समोर आले आहेत.