अमळनेर। तलाठी सजा कमी असल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच वेळेवर काम होत नसल्याची तक्रार असते. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अमळनेर तालुक्यात तलाठी सजा वाढविण्याची मागणी आमदार स्मिता वाघ यांनी केली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
अमळनेर तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र, महसूल मंडळ अंतर्गत असणार्या तलाठी सजा मुख्यालय यातील लोकसंख्या, खातेदार संख्या आणि सजेतील मुख्यालयापासूनचे अंतर या बाबी लक्षात घेवून, तालुक्यासाठी तलाठी सजा वाढीव म्हणजे पुनर्रचना होणे अत्यंत गरजेचे आहे. लोकसंख्या वाढत चालली असून सजाची संख्या त्यामानाने अपुर्या ठरत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सजेची अद्याप वाढीव पुनर्रचना झालेली नाही. यामुळे सजेतील खातेदार यांस तत्काळ सोयी सुविधा मिळत नाहीत. ही बाब लक्षात घेता, यावर उपाय म्हणुन नागरिकांना वेळेवर सेवा मिळावी या दृष्टीकोनातून सजेतील लोकसंख्या विचारात घेऊन तलाठी सजा पुनर्रचना होण्यासंदर्भात ही मागणी केलेली आहे. नागरिकांना वेळेत संबंधित विभागातून सेवा मिळेल. असा विश्वास आमदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केला आहे.