अमळनेरात धाडसी घरफोडी : साडेचार लाखांच्या मुद्देमालासह तिघे जाळ्यात
चोरीच्या दागिण्यांमध्ये दाम्पत्यासह आई भागीदार : आरोपींना 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी
अमळनेर : शहरातील ताडेपुरा भागातील रेखा अनिल लांडगे (40) यांच्या बंद घरातून गतवर्षी 29 जुलै 2021 रोजी सात लाख 94 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरीला गेली होती. या प्रकरणी गोपनीय माहितीवरून अमळनेर पोलिसांनी दाम्पत्यासह आरोपीच्या आईला अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांना न्यायालयाने 12 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. निलेश विनोद माछरे, प्रियंका निलेश माछरे व शीतल विनोद माछरे-कंजर (तिन्ही रा.ताडेपुरा, अमळनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून अटक
धरणगाव रोडवरील ताडेपुरा भागातील रेखा अनिल लांडगे (40) यांच्या बंद घरातून 28 ते 29 जुलै 2021 दरम्यान चोरट्यांनी सात लाख 94 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड लांबवली होती. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. हा गुन्हा आरोपी निलेश विनोद माछरे याने केल्याची माहिती अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर पथकाला त्यांनी कारवाईचे आदेश दिले. 8 एप्रिल रोजी अमळनेर शहरातून आरोपीला अटक केल्यानंतर त्यास 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोठडीदरम्यान आरोपीने चोरी केलेले सोन्याचे दागिने हे पत्नी प्रियंका निलेश माछरे व आई शीतल विनोद माछरे यांच्या मदतीने अमळनेर शहरातील ए.के.ज्वेलर्स यांच्या मदतीने तीन लाख 55 हजारांचे दागिने बनवल्याची कबुली दिली तसेच सुरतच्या वडोदरा येथील नेमाराम चौधरी सराफा दुकानावर दागिणे विक्रीची कबुली दिली. नंतर सराफाने 30 ग्रॅम (एक लाख 55 हजारांची लगड) काढून दिली. या गुन्ह्यात दोघा सासु-सुनेचा सहभाग असल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. तिघांना 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपअधीक्षक राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, किशोर पाटील, मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, सिद्धांत सिसोदे आदींच्या पथकाने केली.