खुनानंतर मारेकरी पसार ; वैमनस्यातून घटना घडल्याचा संशय
अमळनेर– शहरातील बोहरी पेट्रोल पंपाचे मालक बाबा बोहरी उर्फ अली अजगर बोहरी (50, न्यू प्लॉट, अमळनेर) यांचा गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अज्ञात मारेकर्यांनी गोळीबार करून खून केल्याची घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली असून मारेकर्यांचा कसून शोध घेतला जात आहे. या घटनेमागे वैमनस्य असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
एका गोळीत मारेकर्यांनी साधला निशाणा
बाबा बोहरी यांचा शिवाजी गार्डन जवळ बोहरी पेट्रोल पंप आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री ते पंपावर हिशोब घेण्यासाठी आले होते. हिशोब केल्यानंतर ते घराकडे निघाले असताना अवघ्या काही अंतरावर उद्यानाजवळ दबा धरून बसलेल्या चार ते पाच मारेकर्यांनी त्यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी बोहरी यांच्या छातीच्या डाव्या बरगडीत शिरल्यानंतर अशाही अवस्थेत त्यांनी दुचाकी चालवून पेट्रोल पंपावर आणली. पंपावरील कर्मचार्यांना त्यांनी आपल्यावर गोळीबार झाल्याची माहिती दिल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत धुळे रोडवर डॉ.निखील बहुगुणे यांच्या रुग्णालयात हलवण्यात आले. तेथ शथीचे उपचार केल्यानंतर तेथून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलवत असताना बोहरी यांचा मृत्यू झाला.
वैमनस्यातून काटा काढल्याचा संशय
मृत बाबा बोहरी यांची हत्या पैशांच्या लुटीतून झाली असल्याची शक्यता धूसर आहे. मारेकर्यांनी त्यांचे केवळ प्राण घेण्यासाठी गोळीबार केल्याचे बोलले जात आहे. बोहरी यांच्याकडे पेट्रोल पंपावरील पैशांची रोकड असलीतरी चोरट्यांनी ती लांबवली नाही त्यामुळे या घटनेमागे वैमनस्य असल्याची शक्यता अधिक आहे. विशेष म्हणजे बोहरी हे जखमी अवस्थेत पंपावर आले व त्यांनी पैशांची बॅग तेथे ठेवून कर्मचार्यांकडे ग्लासभर पाण्याची मागणी केली व पाणी पिल्यानंतर त्यांना रीक्षातून खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.
शहरात दुसरा खून
अमळनेरात खून झाल्याची ही गेल्या काही महिन्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वीदेखील एका शिक्षकाचा खून करण्यात आला होता तर पुन्हा पेट्रोल पंप व्यापार्याचा निर्घृण खून झाल्याने व्यापारी धास्तावले आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याची अपेक्षा व्यापारीवर्गातून व्यक्त होत आहे.
मृतदेहावर धुळ्यात शवविच्छेदन
मयत बोहरी यांचा मृतदेह अमळनेर रुग्णालयातून पंचनामा केल्यानंतर शुक्रवारी पहाटे धुळे येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. मृत बोहरी यांच्या पश्चात पत्नी, मुले, लहान बंधू असा परीवार आहे. मोहम्मद अल्ली बोहरी यांचे ते मोठे बंधू होत. या घटनेनंतर शहरातील
बोहरी समाजबांधवांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. गोळीबारानंतर डीवायएसपी रफिक शेख, आमदार स्मिता वाघ आदींनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली.