अमळनेर । राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी जिल्हा मेळाव्यात येणार्या काळात भाजपमध्ये भलेभले येणार असल्याचे भाकीत वर्तवून एक दिवसही उलटत नाही तोच अमळनेरात याची प्रचिती आली आहे. येथील नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे अमळनेर शहरच नव्हे तर तालुक्याच्या राजकारणावर अतिशय दूरगामी परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या प्रवेशाच्या अधिकृत कार्यक्रमात माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांची उपस्थिती नसली तरी त्यांच्या कार्यालयास जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी भेट दिल्यामुळे राजकीय निरिक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यांनी घेतला प्रवेश
यावेळी अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांच्यासह उपगराध्यक्ष विनोद लांबोळे, संजय मराठे, विवेक पाटील, रत्ना माळी, रत्नमाला महाजन, नरेंद्र संदनशिव, रामकृष्ण पाटील, शीतल यादव, सुरेश पाटील, चंद्रकला साळुंखे, संतोष पाटील, कमलबाई पाटील, राजेश पाटील, निशांतबानो पठाण, शेखा हाजी मिस्तरी, फय्याज पठाण, अभिषेक पाटील या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश घेतला. त्यांचे ना. गिरीश महाजन यांनी स्वागत केले. अमळनेर तालुक्यापासून राष्ट्रीय भुकंपास सुरवात झाली असून जिल्ह्यातून शेकडो पदाधिकारी भाजपात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहेत असे भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी याप्रसंगी सांगितले.
‘पाडळसरे’ दोन वर्षात पूर्ण करणार
अमळनेर तालुक्यासाठी वरदान ठरणार असणार्या पाडळसरे प्रकल्पाला दोन वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी घोषणा ना. गिरीश महाजन यांनी याप्रसंगी केली. या धरणाच्या कामाला माजी आमदार साहेबराव पाटील यांनीच गती दिली. या पार्श्वभूमिवर ना. महाजन यांनी केल्यानंतर पुष्पलता यांनी घेतलेला प्रवेश लक्षणीय मानला जात आहे. तर या कार्यक्रमात बोलतांना ना. गिरीश महाजन यांनी पुन्हा जोरदार टोलेबाजी केली. आपण एक साधा शिक्षकाचा मुलगा असून सतत आरोग्य सेवेचे कामांमुळे निवडून येतो सामान्य नागरिकांच्या सुख दुःखाचा भागीदार व्हा 15 ते 20 वर्ष मंत्री पद भोगलेल्या लोकांची अवस्था आज काय आहे हे तुम्ही पाहत आहात, असा टोला त्यांनी मारला. नेत्यांनी जमिनीवर राहीले पाहिजे, मी मंत्री असून साधे पणाने राहतो 25 वर्षांपासून राजकारण न करता समाजकारण केले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नेत्र तपासणी शिबिरात प्रवेश
येथील बाजार समितीत पंडीत दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर व भाजपचा राजा गणेश मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विनामुल्य नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. याचे उदघाटन जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खासदार ए.टी.पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, आमदार स्मिता वाघ, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जे.जे.रुग्णालयाच्या नेत्र विभागाच्या प्रमुख डॉ.रागिणी पारेख, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, एड.व्ही.आर.पाटील, सुभाष चौधरी, पंचायत समिती सभापती वजाबाई भिल, शाम अहिरे, महेश पाटील, महेश देशमुख, प्रफुल्ल पवार, महेंद्र बोरसे, विक्रांत पाटील, निरांजनी देशमुख,विवेक पाटील, राकेश पाटील, शीतल देशमुख, जि प सदस्या मीनाताई पाटील,संगीता भिल, गिरीश पाटील, तालुकाध्यक्ष भाजप बाळासाहेब पाटील, डॉ.संदीप जोशी यांच्यासह भाजप जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.
साहेबराव पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी मात्र भारतीय जनता पक्षात प्रवेश केला नाही. ते आणि अनिल भाईदास पाटील यांनी एकत्रीतपणे नगरपालिकेवर सत्ता संपादन करण्यात यश मिळवले होते. मात्र आता त्यांच्या सौभाग्यवतींनी समर्थक नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश घेतल्यामुळे राजकीय समीकरणाला कलाटणी मिळणार आहे. यातून भाजपने एकदचा नगरपालिकेवर सत्ता मिळवत आपल्याच पक्षाचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांनादेखील सूचक इशारा दिला आहे.