अमळनेर । हाताला काम आणि शेतीला पाणी हा शब्द आम्ही अमळनेरकर जनतेला दिला होता त्यानुसार जलयुक्त शिवार कामाच्या माध्यमातून शेतीला पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला असून आता रोजगारासाठी सुतगिरणीचे निर्माण करीत आहोत अवघ्या दोनच वर्षात सुतगिरणीचे निर्माण होऊन पुन्हा उद्योग नगरी म्हणून अमळनेरची ओळख निर्माण होईल, असा विश्वास आमदार शिरीष चौधरी यांनी कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला. राजमाता जिजाऊ शेतकरी सूतगिरणी कार्यालयाचा शुभारंभ प.पु. प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी प.पु. प्रसाद महाराज, आमदार स्मिता उदय वाघ, सुतगिरणीचे चेअरमन डॉ.रवींद्र चौधरी, व्हा. चेअरमन किरणभाऊ गोसावी, संचालक वानखेडे सर व असंख्य मान्यवर उपस्थित होते. स्टेशन रोडवरील हिरा पॅलेस येथे कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. सुरूवातीला महाराजांच्या हस्ते कार्यालयाचा शुभारंभ होऊन प्रातिनिधिक स्वरूपात 11 शेतकरी बांधवाना सूतगिरणी शेअर्सचे वितरण करण्यात आले.
‘पाणी अडवा पाणी जिरवा’ प्रगतीपथावर
या भूमीवर शेतीला पाणी देण्याच्या दृष्टीने स्वखर्चातून जलयुक्त शिवार अभियान राबविले असून हिरा उदयोग समूहाच्या माध्यमातून 1.5 कोटी निधी देऊन अनेक गावांत नाला खोलीकरण केल्यामुळे ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या संकल्पनेस चालना मिळाली असून अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटून शेतीला पाणी मिळणार आहे. हे अभियान यापुढेही सतत सुरु राहणार आहे. त्याच प्रमाणे दिलेल्या शब्दानुसार हाताला काम देण्यासाठी मोठ्या प्रयत्नाने मुख्यमंत्री यांच्या सहकार्याने राजमाता जिजाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणीला आम्ही शासनाची मंजुरी मिळाल्याचे आमदार चौधरी यांनी सांगितले.
अडचण आल्यास शेअर्सची रक्कम परत देणार – डॉ.रवींद्र चौधरी
अमळनेरला पूर्वीप्रमाणेच उद्योग नगरी म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी आमचे हे प्रामाणिक प्रयत्न असून शेतकरी बांधवांकडून सूतगिरणीसाठी आम जनतेचा आमचा कामावर आणि कर्तृत्वावर प्रचंड विश्वास असल्याने हि सूतगिरणी कुठल्याही परिस्थितीत उभी राहणार यात कोणतीही तिळमात्र शंका नाही. परंतु दुरदैव्याने काही अडचण आल्यास शेतकरी बांधवांनी शेअर्सच्या रूपाने दिलेला कष्टाचा पैसा परत करण्यास हिरा उद्योग समूह बांधील राहील व हा आमचा प.पु. प्रसाद महाराजांच्या साक्षीने शब्द आहे, असे अभिवचन सुतगिरणीचे चेअरमन डॉ.चौधरी यांनी आपल्या मनोगतातून दिले.