अमळनेरात रास्ता रोको करत राष्ट्रवादीचा हल्लाबोल

0

अमळनेर । येथील राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर ठिय्या मांडून जोरदार हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील यांनी शासनासह जिल्ह्यातील मंत्र्यांवर जोरदार प्रहार करून शेतकरी बांधवांसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरू यासाठी आम्हाला अटक झाली तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका मांडून शासनाचा निषेध नोंदविला. राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील व तिलोत्तमा पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कार्यालयापासून ढोल ताश्यांच्या गजरात शेकडो कार्यकर्ते प्रांत कार्यालयासमोर दाखल होऊन रस्त्यावर ठिय्या मांडत शासना विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

या हल्लाबोल आंदोलनात शेतकरी, कामगार, व्यापारी, विद्यार्थी, युवा वर्ग, महिला इत्यादी सामाजिक घटकांचे प्रश्‍न सोडविण्यात केंद्रातील ’नरेंद्र’ सरकार व राज्यातील ’देवेंद्र’ सरकार सपशेल अपयशी ठरत असून राज्यातील या घटकांविषयी सरकारच्या उदासीन धोरणाविरोधी हा एल्गार राष्ट्रवादी कडून करण्यात आला. शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, वीजबिल माफ झालेच पाहिजे आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना 12 नोव्हेंबर रोजी नागपुर येथे महामोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात अमळनेर तालुक्यातून हजार ते पंधराशे कार्यकर्ते जाणार अशी घोषणा केली. जिल्ह्यातील जलसंपदा मंत्री यांचेवर प्रहार करून त्यांनी जिल्ह्यासाठी काय केले, याचा खुलासा करावा, असे आव्हान देत शासनाचा धिक्कार केला. तसेच तिलोत्तमा पाटील व शिवाजीराव पाटील यानींही मनोगत व्यक्त करून निषेध नोंदविला. यावेळी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता व दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या विनंतीनुसार कार्यकर्ते प्रांत कार्यालयात दाखल झाले. मात्र तेथे प्रांत व तहसीलदार निवेदन घेण्यासाठी उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.