अमळनेर । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तालुक्यासह व इतर जिल्ह्यातील शेतकर्यांची शेती माल विक्रीसाठी पसंती मिळत असल्याने नवीन संचालक मंडळाने विविध विकासकामांबरोबर 1 मे 2017 पासून सोशल मीडियावरदेखील भरारी घेतली आहे. त्यात शेतकर्यांना फेसबुक, व्हॉट्सअँपवर घरबसल्या दररोजचा बाजार भाव तसेच बाजार समितीबद्दलची संपूर्ण माहिती मिळत आहे. यासाठी सभापती उदय वाघ, उपसभापती, सचिव डॉ.उन्मेश राठोड, सर्व संचालक मंडळ व सर्व कर्मचारी, व्यापारी यांच्याशी संपर्क असलेल्या नागरिकांच्या मोबाईलवर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार भाव सध्या पाठविले जात आहेत.
शेतकर्यांचा सहभाग महत्त्वाचा : शेतकर्याना घर बसल्या अमळनेर कृषी उत्पन बाजार समितीचा बाजार भाव सायंकाळी 6 नंतर फेसबुक व व्हाँट्सअँप, एस.एम.एस.च्या माध्यमातून शेतकर्यांना पाठवण्यात येतो. यावरील हायटेक व डिजिटल कामकाजसाठी अमळनेर येथील केशवा आय.टी.व्हिजनचे संचालक गणेश भामरे व अमळनेर कृउबा समिती टीमचे सहकार्य लाभत आहे. सोशल मिडीयावर शेतकर्यांनी सहभाग घेवुन अमळनेर कृषी उत्पन बाजार समितीचा फेसबुक पेजला जॉईन होऊन व्हाँट्सअँप, संदेशासाठी बाजार समितीत मोबाईल नंबर द्यावा असे आवाहन सभापती उदय वाघ, सचिव व संचालक मंडळाने केले आहे.
शेतकर्यांना बाजारा वारंवार फेरी मारण्याची गरज नाही
बाजार समितीच्या बाजार भाव व महितिसाठी कर्मचारी तालुक्यात फिरून एका गावात 4 ते 5 बाजार समिती शेतकरी मित्र बनवून त्यांच्या मोबाईलवर सर्व अपडेट पाठविणार आहेत व ती माहिती शेतकर्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर सभापती, संचालक मंडळाने ठेवला आहे. जेणेकरुण शेतकर्यांनी आपला शेतीचा माल कधी आणावा हे कळते. तसेच यामुळे शेतकर्यांची फेरीदेखील वाया जात नाही आणि आज रोजी असलेली आवक, भावदेखील शेतकर्यांना कळणार आहे. त्याचबरोबर शेतकर्यांसाठी असलेल्या शासकीय योजनाची माहिती मिळणार आहे. त्यासाठी तालुक्यातील शेतकर्यांचा संपर्क बाजार समितीशी सतत रहावा, याकरीता सोशल मीडियाद्वारे हा उपक्रम राबविला जात आहे, असे सभापती उदय वाघ यांनी सांगितले.
अद्ययावत व्यवस्थेतही बाजार समितीची भरारी
सन 1934 पासून स्थापना झालेल्या बाजार समितीला सतत प्रकाशझोतात ठेवण्यासाठी वेळोवेळी संचालक मंडळाने सहकार्य केल्याने बाजार समितीचा आज मोठ्याप्रमाणावर विस्तार झाला आहे. अमळनेर शहरात सुमारे 17 एकर 79 आर एवढा आवार समितीचा आहे. त्यात स्वतंत्र गुरे बाजार, व्यापार्यांना माल साठवणुकीसाठी मोठ मोठे गोडावून, दुकाने, तसेच बाहेरच्या बाजूस धुळे रोड लगत दुकाने, त्याच आवारात शेतकर्यांसाठी जिल्हा बँकेची कर्ज वाटप शाखा, माल मोजण्यासाठी प्लेटकाटा, शिदोरी गृह, उपहार गृह, पशु खाद्य गृह, स्वच्छता गृह, पाण्याची टाकी, पाणपोई, संपूर्ण कॉक्रीटीकरण, प्रशासकिय इमारत यासह नव्याने बेरोजगारासाठी आतील बाजूस व्यापारी संकुल बांधण्यात येत आहे. अद्यावत अशी व्यवस्था असलेल्याला या बाजार समितीने आज उंच भरारी घेतली आहे .
शेतकर्यांच्या शेताला मिळतो हमी भाव
या बाजार समितीने आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात कापसाला उघड लिलाव पद्धत सुरु करून भाव मिळवुन दिला आहे. त्या बरोबर मुंग, उडीद, गावठी हरबरा, गुलाबी हरबरा, डॉलर हरबरा, धने, ज्वारी, दादर, बाजरी, लाल मका, गहू, तूर, सोयाबीन, भुईमुंग, तीळ, कांदा आदी मालाची विक्रमी आवक असली तरी रोजच्या रोज सायंकाळ पर्यंत माल मोजून शेतकर्यांना रोखीने पेमेंट दिले जाते. यात लाखोची उलाढाल होत असते. त्यामुळे संपूर्ण जळगाव जिल्हासह चोपडा, पारोळा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, भडगाव तसेच धुळे जिल्हासह शिरपूर, शिंदखेडा या तालुक्यातील शेतकरी वर्ग शेतीमाल विक्रीसाठी अमळनेरला आणतात. आता या माध्यमातून शेतकर्यांना नक्कीच फायदा होणार आहे.