अमळनेर तालुक्यात गुरांची चोरी : दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

अमळनेर : अमळनेर शहर व परीसरात वाढत्या गुरे चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पथक गठीत केले होते. या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयीतांच्या मुसक्या आवळल्या असून अन्य तिघे पसार झाले आहेत.

अनेक ठिकाणाहून गुरांची चोरी
काही दिवसांपूर्वी अमळनेर तालुक्यातील गांधली येथून 35 हजारांचा एक बैल, अमळनेर शहरातून सोहम नगरमधून सुमारे एक लाख दहा हजार रुपये किंमतीचे 2 बैल, एक गाय तर शिरूड, इंदापिंप्री येथून चार बैल व एक गाय चोरीस गेले होते. या अनुषंगाने पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी एएसआय विलास पाटील, एएसआय पुरुषोत्तम पाटील, मिलिंद भामरे, जे.डी.पाटील, कैलास शिंदे या पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे तपासासाठी पाठवले असता गुरे चोरून कत्तल करणारे वसीम हुसेन शेख, अमजदखान अजीजखान (मौलवी गंज, धुळे) हे आरोपी मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता शहरात अथवा तालुक्यात टेहळणी करणारा अमळनेर येथीलच शकील शफी शेख कुरेशी (अंबिका नगर, धुळे) हा असल्याचे समजले. त्याला चोरीत मदत करणारा त्याचाच भाऊ रशीद शफी शेख कुरेशी याचेही नाव उघडकीस आले. चोरलेल्या गुरांची वाहतूक करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील रोशन उर्फ आबा मधुकर सोनवणे हा मदत करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पहाटे 3 ते 5 वाजेदरम्यान
या पाचही जणांची टोळी गुरे चोरून त्यांना रोशन सोनवणे पीक अप व्हॅन मध्ये वाहून नेत होता. या गाडीच्या काचेवर भगवा झेंडा लावलेला असल्याने असल्याने गुरांची गाडी कत्तलीसाठी जात आहे याचा संशय कोणालाच येत नसे. चोरी झाल्यानंतर एक किंवा दोन दिवसात धुळ्यामध्ये गुरांची कत्तल केली जात होती.

अनेक गुरांची कत्तल : 27 गुरांची सुटका
पाच संशयीतांच्या टोळीने धरणगाव, शिरपूर, मारवड, चोपडा, पारोळा, चाळीसगाव रोड, अमळनेर येथून गुरे चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. चाळीसगाव रोड धुळे येथून त्यांच्या ताब्यातून 27 गुरे ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यात काही गुरे अमळनेर तालुक्यातून चोरलेली आहेत. तेथील गो शाळेत ती गुरे जमा आहेत. काही गुरांची कत्तल केल्याची कबुली आरोपीनी दिली आहे. शकील कुरेशी, रशीद कुरेशी व रोशन सोनवणे तिघे पसार असून वसीम हुसेन शेख, अमजदखान अजीजखान (मौलवी गंज, धुळे) यांना अटक करण्यात आली असून आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.