अमळनेर : तालुक्यात दिवसेंदिवस वाढत जाणारा उन्हाचा तडाखा आणि त्यात उद्भलेली दुष्काळजन्य स्थिती, सातत्याने जाणावणारी पाणी टंचाई, पशुखाद्य तसेच चार्यांचे वाढलेले भाव, शासनाच्या विविध योजना गावपातळीवर न पोहोचणे या व इतरही अनेक कारणांमुळे पाळीव जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून एकेकाळी मोठ्या संख्येने दिसणारे पाळीव प्राण्यांचे गोठे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी जनावरे राखणार्या गुराख्यांवरही बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. कडब्याचे दर वाढल्यामुळे पशुपालकांनी जनावरे विक्रीला काढली आहेत. सात ते आठ वर्षांपूर्वी शेकडा 90-100 रुपयाप्रमाणे कडबा मिळत असे पेरणीच्या तोंडावर शेतकरी शे-दोनशे कडबा पेंडी विकत घेत होता. कडब्यांची गंजी वर्षभर शेतात लावलेली असायची पण नगदी पिकांच्या पद्धतीमुळे ज्वारी,बाजरी खालील क्षेत्र झपाटयाने घटले. कापूस, कडधान्य, लागवडीकडे वाळलेल्या शेतक र्यांना कडबा टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
चार्याची उपलब्धता कमी असल्याने शेतकर्यांची वणवण
पूर्वी ग्रामीण भागात गाय, म्हैस, बैल, शेळ्यासह इतर पाळीव प्राण्यांची संख्या मोठी होती. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी गाई-म्हशी पाळायचे. अनेक चाकरमानी मंडळीही हौसेखातर गाई-म्हशी बाळगून राहत. बेरोजगारीवर मात करीत अनेकांनी सुरू केलेला पशुपालन व दुग्ध व्यवसाय भरभराटीला आला होता. गुराख्यांकडे सांभाळण्यासाठी येणार्या जनावरांची संख्या दीडशे ते दोनशे होती. या व्यवसायातून गुराख्यांना मोठा रोजगार मिळायचा. आजच्यासारखी पाणी आणि चारा टंचाई तेव्हा नव्हती. हिरवा चारा मुबलक प्रमाणात मिळायचा. चार्यांच्या पेंडीचे भाव सामान्य शेतकर्यांना परवडणारे होते. पाच दहा रुपयात हिरव्यागार लुसलुशीत गवाताचा भारा मिळायचा. परंतु, चारा आणि इतर वस्तूंमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई गुरांची आणि गोठ्यांची संख्या कमी झाली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात प्रत्येक तालुका पातळीवर किमान 5 ते 6 गोठे आणि शंभर ते सव्वाशे जनावरे, अशी परिस्थिती असताना गेल्या दोन वर्षांत गोठे आणि सोबतच गायीची संख्यादेखील अचानक कमी झाली आहे.
पर्जन्यावर परिणाम झाल्याने चार्याचा प्रश्न ऐरणीवर
काही वर्षांंपासून पर्जन्याचे प्रमाण कमालीचे घटल्याने ग्रामीण भागात शेतकर्यांना चारा व पाणी प्रश्न प्रकर्षांने जाणवू लागला आहे. चार्याचे भाव आकाशाला टेकले आहेत. अनेक ठिकाणी पाण्याची मोठी समस्या आहे. विहिरींना पुरेसे पाणी नाही, पाणी असेल तरी वीज नाही, अशी बिकट स्थिती आहे. अशा दुष्काळजन्य स्थितीत जनावरे सांभाळणे शेतक र्यांना परवडेनासे झाले आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात बैल, गाय आणि म्हैस यांच्यासह विविध पाळीव पशु पक्ष्याची बेभाव विक्री केली जात आहे. शेतकरी आधीच कर्जबाजारी असल्यामुळे आणि त्यातही शेतीला पुरेसे पाणी मिळत नसेल व जनावरांची निगा राखली जात नसेल तर शेतक र्यांना शेतामध्ये काम करणे कठीण आहे. सरकारचे जनावरांच्या चारा-पाण्याकडे दुर्लक्ष आहे. शेतकरी, पशुपालंकासमोर ही मोठी समस्या उभी ठाकली आहे. उन्हाचा तडाखा वाढला असल्यामुळे अनेक विहिरींना पाणी नाही, बोअर वेली आटल्या आहेत. त्यामुळे शेतामध्ये ओलिताचे क्षेत्र कमी झाले आहे. जनावरांसाठी चारा पाणी समस्या निर्माण झाली आहे. एकेकाळी साठ रुपये शंभर याप्रमाणे कडबा कोणी विकत घेत नसे आज याच कडब्याचे दर वाढले आहे. नियोजनाचा अभाव असलेल्या शेतकर्यांनी ज्वारीचे क्षेत्र घटविले आहे. त्यामुळे चारा टंचाई उद्भवली आहे त्यामुळे पशुपालक पाळीव जनावरे विक्रीस काढत शेतकर्यांमधून बोलले जात आहे
– अमोल पाटील, अमळनेर
9623610808