अमळनेर (अमोल पाटील) । शहरासह परिसरात उन्हाचा तीव्र कडाका वाढला आहे. उन्हाची तिरीप आणि उकाडा वाढत असल्याने ग्रामीण भागातील दैनंदिन कामांच्या वेळात बदल झाले आहेत. माठ, शीतपेये, कलिंगड यांच्या विक्रीला प्रतिसाद मिळत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतमजूर सकाळी लवकर कामाला सुरवात करीत आहेत. दुपारी उन्हाच्या वेळेत विश्रांती घेऊन संध्याकाळी उशिरापर्यंत शेतात थांबत आहेत. दुपारी बारा ते सायंकाळी पाचपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने या वेळेत रस्त्यावरील वर्दळ रोडावली आहे. पहाटे व सायंकाळी फिरायला जाणार्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पिकांनाही उन्हाची झळ लागत असल्याने जादा पाणी देण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळ सत्रात भरत आहेत. बाजारपेठेत माठ विक्रीला प्रतिसाद मिळत आहे.
माठांची बाजारात विक्री
गेल्या चार महिन्यांपासून मुक्कामठोकलेल्या थंडीने गेल्या आठवडाभरापासून पळ काढला आहे. उन्हाची तीव्रता वाढली असून सकाळी 9 वाजल्यापासूनच कडक उन पडत आहे. तर दिवसभर हवेत प्रचंड उष्मा निर्माण होत आहे. गेल्या 15 दिवसांत कधी थंडी, कधी उकाडा निर्माण होत होता. गेले आठ दिवसांपासून अचानक तापमानात वाढ झाली आहे. या तापमानाचा परिणाम होऊन अनेकजण आजारी पडत आहेत. उष्मा वाढल्याने बाजारात विक्रीसाठी आलेले थंड पाण्याच्या माठाची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. यंदाही माठाच्या किंमती वाढलेल्या आहेत. मात्र, तरीही तहान भागवण्यासाठी सर्वसामान्य ग्राहक माठ खरेदी करताना दिसत आहेत. मारवाडी माठ 350 रु. बंगाली फिल्टर 350 व गावरान माठ 100 रु. बंगाली रांजण 400, राजस्थानी 250 रुपयांना आहेत. बंगाली व राजस्थानी माठांना जास्त मागणी आहे.
गारवा देण्याच्या वस्तूंना बाजारात मागणी
गारवा देणारी फळे बाजारात विक्रीस आली असून द्राक्षे, कलिंगडाला मोठी मागणी आहे. 50 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंतची कलिंगडे बाजारात मिळत आहेत. तर 100 रु., 80 रु. किलो द्राक्षे मिळत आहेत. रस्त्यावर आंबा, मोसंमी ज्युसच्या गाड्यांवरही गर्दी वाढत आहे. तर आईस्क्रिम व विविध शितपेयांचीही मागणी वाढली आहे. सर्वसाधारणपणे मे महिना संपेपर्यंत म्हणजे अजून दोन ते अडीच महिने उन्हाची तीव्रताराहणार असल्याने मफलर, सनकोट आदी उन्हापासून संरक्षण करणार्या वस्तू खरेदी केल्या जात आहेत. इलेक्ट्रिक वस्तूंचीही मागणी वाढली असून फ्रीज तसेच पंख्यांची मागणी वाढली असल्याने इलेक्ट्रॉनिक दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.
साहित्य बनविण्यासाठी महिलांची मोठी वर्दळ
छोट्या मोठ्या आकारातील नळ असलेले माठ विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. शीतपेयांच्या दुकानात वर्दळ वाढली आहे. आठवडा बाजारात कलिंगडांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. बर्फाच्या लादीवर कापून ठेवलेल्या कलिंगडांच्या फोडी ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. आईस्क्रीम विक्रेत्यांच्या फिरत्या गाड्याभोवती मुलांची गर्दी आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोप्या, मोठे रुमाल, गॉगल विक्रीला प्रतिसाद आहे. वर्षभरात वापरण्यात येणारे उन्हाळी साहित्य बनवण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे. वेगवेगळ पापड, वेफर्स, कुरवड्या, शेवया, चटणी तयार करण्यात महिला व्यस्त आहेत. उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून तापमानात कमालीची वाढ झाल्याने नागरीक घामाघूम झाले आहेत. उन्हाळ्याची तीव्रता कमी करण्यासाठी शहरात थंड पाण्यासाठी मातीच्या माठांबरोबरच रसदार, तहान भागवणारी फळेही विक्रीस आली आहेत.