अमळनेर तालुक्यात दुबारचे संकट

0

अमळेनर (अमोल पाटील) । पावसाळा सुरू होवून दिड महिना होत आला आहे. सुरूवातील पावसाने चांगली सुरूवात केली मात्र त्यानंतर पावसाने पुर्णपणे पाठ फिरवल्याने लागवड व पेरण्या झालेल्या शेतकर्‍यांची चिंता वाढली असून येत्या दोन दिवसात जर मान्सून तालुक्यात सक्रिय नाही झाला तर दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर ओढवणार आहे. तर तालुक्यात बरयाच गावातील शेतकर्‍यांनी लागवड केलेले पीक रोटा मारून शेतीत पुन्हा लागवड करण्यासाठी तयार करत आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल झालेला मान्सून गायब झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामाची जोरदार तयारी केलेल्या शेतकर्‍यांचा जीव भांड्यात सापडला असून दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर आले आहे.

हवामान खात्याचे अंदाज ठरताय खोटे
जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस तालुक्यातील काही भागात दाखल झाला होता. यामुळे शेतकरी वर्गात या पाऊसामुळे आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र यंदा सुरवातीला झालेल्या तीन दिवस दमदार पावसाने शेतकर्‍यांच्या अशा पल्लवीत झाल्या होत्या. पाऊस पडल्यानंतर शेतकर्‍यांनी मशागतीची कामे व खरिपाच्या पेरण्या केल्या. तर यंदा महाराष्ट्रात 10 जून पासून दमदार पाऊसाची हजेरीचे अंदाज हवामान खात्याने दिले होते. यामुळे शेतकर्‍यांच्या खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. शेतकरी वर्गात याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र गेल्या सहा दिवसापासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे.

पावसासाठी वरूणराजाला साकडे
जून महिन्याच्या सुरवातीला तालुक्यात पावसाने जोर धरल्यामुळे शेतकर्‍यांनी कपाशी लागवड सह पेरणीस सुरवात केली होती परंतु आता अर्धा महिना उलटूनही पाऊस पडत नसल्यामुळे तालुक्यात 80 टक्के हेक्टरमध्ये दुबार पेरणी करावी लागणार आहे. तालुक्यात दरवर्षी 62.678 हेक्टर क्षेत्र हे लागवड व पेरणीसाठी वापरले जाते त्यात 15 जूननंतर 2915 हेक्टर जमीनीत शेतकर्‍यांनी पेरा केलेला आहे. त्यात 2780 हेक्टर कपाशी, 200 हेक्टर मूग व 100 हेक्टरमध्ये उडीद तर काही हेक्टर मध्ये बाजरी व ज्वारीची पेरणी झालेली असल्यामुळे तालुक्यातील 2000 हेक्टर मध्ये म्हणजेच सुमारे 80 टक्के हेक्टर क्षेत्र दुबार पेरणी करावी लागणार आहे. सततची नापिक, दुष्काळ व आता मान्सून लांबल्याने दुबार पेरणीचा फटका बसणार आहे. यावर्षी मिरीग पेरणीही शेतकर्यांना सापडली नाही त्यामुळे अनिश्‍चिततेचे सावट आहे. पाऊस लांबल्यास सरासरी उत्पन्नात घट होणार असल्याने चिंता पसरली आहे. वरूण राज्याच्या आगमनासाठी अनेक शेतकर्‍यांनी ग्रामदेवतांना साकडे घातले आहे.

29 गावांना पाणीटंचाई
तालुक्यात पाणीटंचाई समस्या भेडसावत असून तालुक्यातील 29 गावांना पाणी टॅकरद्वारे सुरु आहेत. त्यात वासरे बु, खरदे बु, खेडी बु, खेडी खुर्द, खेडीसिम या गावांनी स्वतः हुन टँकर बंद करून घेतले तर डांगर, पिपळे बु, धानोरा, देवगाव देवळी, अंचलवाडी, सबगव्हाण,शिरसाळे बु, भरवस, लोणपंचम, सुंदरपट्टी, इंद्रापिप्री,पिपळे खु, कचरे, गडखांब, आर्डी, अनोरे, सारबेटे बु, निसर्डी, खडके, पिपळी प्रा.वाघोदे, जानवे मंगरूळ, भोरटेक, गलवाडे बु, गलवाडे खु या 25 गावांना भीषण पाणी टंचाई असून या गावांना टँकर सुरु करण्यात आले आहे.