अमळनेर तालुक्यात परिचालकांची नियुक्ती करा

0

अमळनेर । तालुक्यातील संग्राम प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना आपले सरकार सेवा केंद्रात नियुक्ती मिळण्याची मागणी करीत 1 मार्चपासून बेमुदत काम बंद करण्याची निवेदन महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने पंचायत समिती गटविकास अधिकारी अशोक पटाईत यांना देण्यात आले आहे. मागील संग्राम प्रकल्पाची मुदत डिसेंबर 2015 रोजी संपलेली असतांना मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी दिलेल्या आश्वासनामुळे राज्यातील ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद स्थरावरील संगणक परिचालकांनी विनामानधन काम सुरु ठेवले होते त्यातच शासनाच्या 11 ऑगस्ट 2016 च्या शासन निर्णयानुसार संग्राम प्रकल्पाऐवजी आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाची सुरवात करण्यात आली. त्यात संग्राम प्रकल्पातील सर्वच संगणक परिचालकांना घेण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र शासन निर्णयातील 15 लाख उत्पन्नच्या जाचक अटीमुळे आपले सरकार सेवा केंद्राची संख्या कमी झाली.

परिणामी राज्यातील सुमारे 5500 संगणक परिचालकांना घरी बसण्याची वेळ आली. त्यामुळे शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून आता 6 महीने झाले आहेत, तरीही कोणत्याही संगणक परीचालकांना घेण्यात आले नाही. प्रत्येक वेळी निवेदन प्रत्यक्ष भेटून ग्रामविकास विभागाचे सचिव व मुख्यमंत्र्याचें विशेष कार्याअधिकारी यांच्या सोबत वेळोवेळी बैठका झाल्या आहेत, तरी देखील संगणक प्रकल्पातील सर्व संगणक परीचालकांना घेण्यात येईल याचे फक्त आश्वासन देण्यात येते. आपले सरकार सेवा केंद्रच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने डिजिटल करण्याचे इचछा प्रत्येक संगणक परीचालकाच्या मनात आहे परंतु गेल्या 5 वर्षांपासून संग्राम प्रकल्पात काम करणार्‍या सर्व संगणक परीचालकाच्या नियुक्ती होत नसल्याने बुधवार 1 मार्च 2017 पासून बेमुदत कामबंद करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.